Pune ZP President, Vice President Election : यंदाच्या गुढी पाडव्याच्या पूर्वसंध्येला पुणे झेडपीसाठी 'गुड न्यूज' : झेडपीला मिळणार नवे अध्यक्ष व उपाध्यक्ष!
तब्बल सुमारे चार वर्षांचे प्रशासकराज संपणार : पुणे झेडपीच्या नवीन सभागृहाचा कार्यकाल १८ मार्च २०२६ पासून सुरू होणार
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १ मार्च २०२६ :- यंदाचे मराठी नववर्ष गुढीपाडवा हे पुणे जिल्हा परिषद व जिल्ह्यातील ग्रामस्थांसाठी मोठे लक्की ठरणार आहे. यंदाच्या गुढीपाडव्याची पूर्वसंध्या जिल्हा परिषदेसाठी मोठी 'गुड न्यूज ' देणारी ठरणार आहे. कारण या पुर्वसंध्येला जिल्हा परिषदेचे नवे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडले जाणार आहेत. यामुळे गेल्या सुमारे ४ वर्षांपासून असलेली अध्यक्ष पदाची प्रतिक्षा या दिवशी संपणार आहे. शिवाय प्रदीर्घ काळापासून जिल्हा परिषदेवर सुरू असलेलले प्रशासकराज संपुष्टात येणार आहे. दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेच्या नवीन सभागृहाचा (कार्यकारिणी) कार्यकाल हा मागील सभागृहाच्या तुलनेत दोन दिवस आधीच म्हणजे दि. १८ मार्चपासून सुरू होणार आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम रविवारी जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा होणार आहे. या सभेतच साध्या बहुमताच्या आधारे जिल्हा परिषदेचे नवे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडले जाणार आहेत.
दरम्यान, अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठीची प्रक्रिया ही दि. १८ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सुरू होईल. यानुसार त्याच दिवशी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर दुपारी १ ते २ या कालावधीत उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे. उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या अध्यक्षतेखाली नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठीची सर्वसाधारण सभा सुरू होणार आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या मावळत्या सभागृहाचा कार्यकाल हा दि. २२ मार्च २०२२ रोजीच संपला होता. तेव्हापासून आजतागायत जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि चारही विषय समित्यांची सभापती पदे रिक्त आहेत.
पुणे 'झेडपी' वर ३ वर्षे ११ महिने २८ दिवस प्रशासकराजची नोंद
दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेवर दि. २२ मार्च २०२२ ते दि. १८ मार्च २०२६ असे एकूण ३ वर्षे ११ महिने २८ दिवस प्रशासकराज राहिल्याची जिल्हा परिषदेच्या इतिहासात नोंद होणार आहे. या सुमारे चार वर्षांच्या कालखंडात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, रमेश चव्हाण, संतोष पाटील आणि विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील या चार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रशासक म्हणून जिल्हा परिषदेचे काम पाहिले आहे.
जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल
- राष्ट्रवादी काँग्रेस --- ५१
- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष --- ०१
- भाजप --- १०
- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) --- ०६
- शिवसेना --- ०५
- एकूण --- ७३
- साध्या बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ --- ३७