Zilla Parishad Precident electon : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडी येत्या २० मार्चपूर्वी करा! 

राज्याच्या ग्रामविकास विभागाचा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश : पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार! 

Zilla Parishad Precident electon : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडी येत्या २० मार्चपूर्वी करा! 

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २५ फेब्रुवारी २०२६ :- महाराष्ट्रातील निवडणूक झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापतींच्या निवडी येत्या २० मार्चपूर्वी करण्याचा आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. या आदेशामुळे पुणे जिल्हा परिषदेचे नवे अध्यक्ष व उपाध्यक्ष आणि पुणे जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. 

राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशीव, लातूर आणि परभणी या बारा जिल्हा परिषदा आणि या सर्व जिल्हा परिषदांच्या अखत्यारीतील एकूण १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान झाले होते. त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी पूर्ण करून निकाल जाहीर करण्यात आले आहेत. 

अध्यक्ष निवडीनंतर नव्या सदस्यांचा कार्यकाळ सुरू होणार! 

महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या अधिनियम, १९६१ च्या कलम ११(१) आणि कलम ५९(१) मधील तरतुदीनुसार सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ हा पहिल्या बैठकीपासून सुरु होत असतो. त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेच्या नवीन जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाळ हा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीपासून सुरू

नवीन पदाधिकारी निवडीसाठी नुकताच निकाल जाहीर झालेल्या सर्व जिल्हा परिषदांचे नवे अध्यक्ष व उपाध्यक्ष आणि पंचायत समित्यांची पहिली सभा येत्या दि. २० मार्चपुर्वी आयोजित करावी आणि या सभेत आपापल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे नवे पदाधिकारी निवडावेत, असे ग्रामविकास विभागाचे अवर सचिव बी. एम. आसोले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या आदेशात नमूद केले आहे. 

दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेच्या मागील कार्यकारी मंडळाची मुदत ही दि. २० मार्च २०२२ रोजी तर, पुणे जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या कार्यकारी मंडळाची मुदत ही दि. १३ मार्च २०२२ रोजीच संपली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या अधिनियम, १९६१ मधील तरतुदीनुसार, जिल्हा परिषदा तसेच पंचायत समित्यांची पहिली बैठक ही येत्या २० मार्च, २०२६ पूर्वी आयोजित करावी, असे या आदेशात म्हटले आहे.