Pune Zp Precident : पुणे जिल्हा परिषदेचे नवीन अध्यक्ष, उपाध्यक्षांचे नाव निश्चितीचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना सर्वाधिकार!
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित झेडपी सदस्यांच्या बैठकीत निर्णय : इच्छुकांचे अर्ज घेण्याचा निर्णय रद्द
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ६ मार्च २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेच्या नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे नाव निश्चित करण्याचे सर्वाधिकार उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना देण्याचा निर्णय शुक्रवारी दि.६ मार्च) राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आला. यामुळे नवे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची नावे आता पालकमंत्री सुनेत्रा पवार सुचविणार आहेत. पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी सुचविलेल्या नावांना एकमुखी पाठिंबा दर्शविण्याचेही या बैठकीत ठरले. दरम्यान, या निर्णयामुळे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांसाठी इच्छुकांकडून अर्ज दाखल करून घेण्याबाबतचा याआधीचा निर्णय रद्द करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आणि पुणे जिल्हा समन्वयक सुरेश घुले यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. ६ मार्च) राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची घोषणा मावळचे आमदार सुनील शेळके यांनी या बैठकीत सदस्यांना मार्गदर्शन करताना केली.
पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या जिल्हा परिषद सदस्यांकडून लेखी अर्ज भरून घेण्याचा निर्णय याआधी घेण्यात आला होता. यानुसार पुर्वनियोजित कार्यक्रमानुसार शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या झेडपी सदस्यांच्या बैठकीत इच्छुकांकडून हे अर्ज भरून घेण्यात येणार होते. यामुळे सर्वच सदस्य इच्छुक म्हणून अर्ज करतील. परिणामी नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे नाव निश्चित करण्याचे काम जिकिरीचे बनेल. त्याऐवजी ही नावे निश्चित करण्याचे सर्वाधिकार उपमुख्यमंत्री व पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना देण्याचा निर्णय घेऊ, अशी सूचना आमदार सुनील शेळके यांनी केली. त्यांची ही सूचना एकमताने मंजूर करण्यात आली.
दरम्यान, गटनेत्याच्या निवडीनंतर सर्व सदस्यांनी नवनिर्वाचित गटनेते श्रीमंत ढोले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाची रीतसर नोंदणी केली.