Minister chandrakant patil meeting : पुणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली पुणे झेडपीतील दोन्ही शिवसेना आणि भाजपच्या सदस्यांची संयुक्त बैठक!
भाजपकडून पुणे स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीची पूर्वतयारी सुरू झाल्याची चर्चा
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ३ एप्रिल २०२६ :- राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी (दि.३ एप्रिल) पुणे जिल्हा परिषदेतील भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या पुणे जिल्हा परिषद सदस्यांची संयुक्त बैठक पुणे येथे घेतली. जिल्हा परिषद सदस्यांची ही संयुक्त बैठक म्हणजे पुणे जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीच्या पूर्वतयारीचा एक भाग असल्याचा प्राथमिक अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी भाजप आणि दोन्ही शिवसेनेच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांची ओळख करून घेतली आणि या सर्वांशी संवादही साधला. मात्र या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि या पक्षाच्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी हजेरी लावल्याने पुणे शहर व जिल्ह्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
या बैठकीला दौंडचे भाजपचे आमदार ॲड. राहूल कुल, भोरचे माजी आमदार आणि भाजप नेते संग्राम थोपटे, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, खेडचे आमदार बाबाजी काळे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, प्रदीप कंद, माजी मंत्री बाळा भेगडे, पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप आदींसह भाजप व दोन्ही शिवसेनेचे पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य उपस्थित होते.
पुणे जिल्ह्याचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास हेच आपले सर्वांचे अंतिम ध्येय आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याच्या प्रगतीसाठी आणि जनसामान्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी समन्वयाने आणि एकजुटीने काम करावे, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.
