Pune ZP office bearer tenure : पुणे झेडपीच्या नव्या कारभाऱ्यांचा सव्वा-सव्वा वर्षाचा कार्यकाळ?, राष्ट्रवादी काँग्रेसकडून हालचाली सुरू!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेडपी सदस्यांमध्ये मोठी अस्वस्थता : सव्वा वर्षात कामे कशी करणार, असा सदस्यांचा सवाल 

Pune ZP office bearer tenure : पुणे झेडपीच्या नव्या कारभाऱ्यांचा सव्वा-सव्वा वर्षाचा कार्यकाळ?, राष्ट्रवादी काँग्रेसकडून हालचाली सुरू!

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ७ मार्च २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेचे नवीन पदाधिकारी निवडताना संबंधित नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना अडीच वर्षांचा नव्हे तर, सव्वा वर्षाचा कार्यकाळ देण्याच्या हालचाली राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केल्या आहेत. यामुळे पहिल्या अडीच वर्षांच्या कालखंडात सहाऐवजी बारा सदस्यांना संधी मिळेल, अशी अटकळ बांधली जात आहे. पक्षाच्या वतीने याबाबतची कल्पना सर्व सदस्यांना देण्यात आली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या या नव्या खेळीमुळे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. सव्वा वर्षाच्या इतक्या अल्प कालावधीत विकासकामे कशी करता येणार, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित झेडपी सदस्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर उपस्थित केला आहे. 

जिल्हा परिषदेवर पदाधिकारी म्हणून संधी द्यायचीच असेल तर, किमान अडीच वर्षांचा कार्यकाळ द्यावा, अशी मागणीही या सदस्यांनी केली आहे. केवळ अनेकांना पदाधिकारी म्हणून संधी देण्यासाठी जिल्ह्यातील विकासकामांचा खेळखंडोबा व्हायला नको,अशी भीतीही या सदस्यांनी बोलून दाखवली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांची गटनेता निवडीसाठी पुणे येथे नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पक्षाच्या काही नेत्यांनी मनोगत व्यक्त केले. हे मनोगत व्यक्त करताना जास्तीत जास्त जिल्हा परिषद सदस्यांना  पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळावी,या दृष्टीने पक्ष विचार करत आहे. यानुसार नवीन पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ हा अडीच वर्षांऐवजी सव्वा -सव्वा वर्षांचा करण्याचा पक्ष गांभिर्याने विचार करत असल्याचे सदस्यांना सांगण्यात आले. 

सदस्यांमध्ये आनंदाऐवजी अस्वस्थता! 

मुळात आधीच तब्बल चार वर्षांच्या खंडानंतर पुणे जिल्हा परिषदेत पदाधिकारी निवडले जाणार आहेत. त्यातच अनेक सदस्य हे पहिल्यांदाच जिल्हा परिषदेवर निवडून आलेले आहेत. यापैकी कित्येक सदस्यांनी आतापर्यंत झेडपीची पायरीही चढलेली नाही. त्यामुळे नवीन सदस्यांना जिल्हा परिषद समजून घेण्यासाठीच किमान वर्षभराचा कालावधी लागणार आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ सव्वा-सव्वा वर्षाचा करण्याचे विचाराधीन असल्याचे सांगताच, उपस्थित सदस्यांमध्ये आनंदाऐवजी मोठी अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.