Reading is a culture : वाचन हा संस्कार : काय वाचावे आणि कसे वाचावे हे विद्यार्थ्यांना शिकवावे!
विद्यार्थी चळवळीतील युवा नेतृत्व विवेकानंद पाटील यांचे प्रतिपादन : शिक्षक अशैक्षणिक कामांत गुंतल्याने विद्यार्थ्यांच्या अध्यापनाकडे दुर्लक्ष
ग्रामराज्य वृत्तसेवा
पिंपळगाव घोडे, (ता. आंबेगाव), दि. १७ नोव्हेंबर २०२६ :- वाचन हे विद्यार्थ्यांना समृद्ध करते. परंतू, सध्याच्या काळात विद्यार्थ्यांना केवळ वाचन करा, असे सांगून चालणार नाही, तर त्यांना काय वाचावे, कसे वाचावे आणि वाचनाची गोडी कशी निर्माण करावी, हेही शिकवावे लागेल. वाचन हा एक संस्कार असून तो समाजात रुजविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे. दुसरीकडे, शिक्षकांना अशैक्षणिक आणि विविध ऑनलाइन कामांमध्ये गुंतवून ठेवल्याने त्यांना विद्यार्थ्यांना शिकविण्यास पुरेसा वेळ मिळत नाही, ही शिक्षणव्यवस्थेतील शोकांतिका आहे, असे प्रतिपादन विद्यार्थी व पर्यावरण चळवळीतील युवा नेतृत्व आणि प्रखर वक्ते विवेकानंद पाटील यांनी येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलताना केले.
पुणे जिल्ह्यातील पिंपळगाव घोडे ( ता. आंबेगाव) येथे जिव्हाळा मित्र परिवाराच्या वतीने आयोजित ‘सण दिवाळीचा, जागर विचारांचा’ या उपक्रमांतर्गत ‘आजचे प्रश्न, उद्याचे भविष्य आणि नव्या पिढीची भूमिका’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध उद्योगपती व समाजरत्न नानजीभाई ठक्कर, शारदा प्रबोधिनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग महाराज येवले, उद्योजक सुनील गावडे, ग्रामविकास विभागाचे माजी उपसचिव डी. बी. बोऱ्हाडे, साने गुरुजी कथामालेचे अध्यक्ष बाळासाहेब कानडे आदी उपस्थित होते.
पाटील पुढे म्हणाले, "समाजाची प्रगती ही केवळ एखाद्या व्यक्तीच्या प्रयत्नांवर अवलंबून नसते. त्यासाठी समाजातील प्रत्येकाने एक पाऊल पुढे टाकणे गरजेचे आहे. समाज म्हणून प्रत्येकाचे काही उत्तरदायित्व असते. मी एकट्याने काही केले तरी त्याचा फारसा उपयोग होणार नाही. समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे पुढाकार घेतला, तरच सकारात्मक परिवर्तन घडू शकते. त्यामुळे सामाजिक प्रश्नांकडे केवळ इतरांची जबाबदारी म्हणून न पाहता प्रत्येकाने आपली भूमिका ओळखली पाहिजे."
आजची तरुण पिढी ही उद्याच्या समाजाचे भविष्य आहे.या पिढीमध्ये विचार करण्याची क्षमता, सामाजिक भान व विवेकशील दृष्टिकोन निर्माण करणे आवश्यक आहे.केवळ हुशार होणे पुरेसे नाही,तर माणसाने विवेकी होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी समाजात चांगले विचार पेरावे लागतील आणि नव्या पिढीला विचारप्रवृत्त करावे लागेल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
उत्तर पुणे जिल्ह्यात प्रथमच कार्यक्रमासाठी आलेल्या विवेकानंद पाटील यांचा भीमाशंकर मंदिराची आकर्षक प्रतिमा (फ्रेम) भेट देऊन सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाचे नियोजन गणपतराव ढेरंगे, शंकरशेठ शहा, दत्तात्रेय वाळूंज, दत्ताशेठ बोऱ्हाडे, दत्ता शिनोलीकर, मनोहर बोऱ्हाडे, आशिष पुंगलिया, डी. बी. बोऱ्हाडे, निळूशेठ होणराव, श्रीराम येवले, इंदाराम भवारी, दीपक कोकणे, भरत फदाले, श्रीकांत नेहरकर, डॉ. सुनील चिखले आणि सुरेंद्र फदाले यांनी केले.
हनुमान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीराम येवले यांनी सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक महाळुंगे घोडे गावचे उपसरपंच गणपतशेठ ढेरंगे यांनी प्रास्ताविक केले, तर डी. बी. बोऱ्हाडे यांनी आभार मानले.
'विवेकाचा तिसरा डोळा उघडला की माणसाला शहाणपण येते'
माणूस हुशार झाला, पण विवेकी होण्यासाठी समाजात विचारांची पेरणी करावी लागेल. समाजाला शहाणे करण्याची गरज आहे. संतांचे विचारच माणसाला खरे आत्मिक समाधान देत असतात. राजकारण वाईट नाही.मात्र राजकारणातील अस्वच्छ विचारांचे प्रदूषण थांबविण्याचे काम युवकांनी केले पाहिजे. नव्या पिढीने विवेक, विचार आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून पुढे येणे आवश्यक आहे.
- विवेकानंद पाटील,
विद्यार्थी व पर्यावरण चळवळीतील युवा नेतृत्व.
