Pune Zp Ajit Pawar statue inauguration : पुणे जिल्हा परिषदेत अमित शहा आले, देवेंद्र फडणवीस आले, एकनाथ शिंदे आले, दत्तात्रेय भरणे आले, चंद्रकांत पाटील आले, मुरलीधर मोहोळ आले, पण 'अजितदादा'च नव्हते! 

ज्या वास्तूला 'अजितदादां'नी आकार दिला, त्याच वास्तूत त्यांच्या पुतळ्याचे अनावरण, 'अजितदादां' ची उणीव : समारंभाला अजित पवार यांची अनुपस्थिती मनाला चटका लावणारी!

Pune Zp Ajit Pawar statue inauguration : पुणे जिल्हा परिषदेत अमित शहा आले, देवेंद्र फडणवीस आले, एकनाथ शिंदे आले, दत्तात्रेय भरणे आले, चंद्रकांत पाटील आले, मुरलीधर मोहोळ आले, पण 'अजितदादा'च नव्हते! 

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १७ नोव्हेंबर २०२६ :-  पुणे जिल्हा परिषदेत सोमवारी (दि.१६ नोव्हेंबर) झालेल्या भव्यदिव्य समारंभासाठी पुणे जिल्हा परिषदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आले, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आल्या, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील,  कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे आले, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आले,  ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आले, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ आल्या, ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम आले, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आले, पण अजित पवार हेच नव्हते. निमित्त होते, पुणे जिल्हा परिषदेतील दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण आणि मुख्य प्रवेशद्वार नामकरण समारंभाचे. त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेतील या दिग्गजांच्या उपस्थितीतीतील या समारंभाला एक वेगळीच भावनिक किनार लाभल्याचे चित्र पहावयास मिळाले. 

पुणे जिल्हा परिषद आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाते केवळ एका लोकप्रतिनिधीपुरते किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेपुरते मर्यादित नव्हते, तर ते जिव्हाळ्याचे आणि आत्मीयतेचे होते. पुणे जिल्हा परिषदेला विकासाच्या प्रक्रियेत केवळ पुणे जिल्ह्यातच नव्हे, तर महाराष्ट्रात महत्त्वाचे स्थान मिळवून देण्यात अजित पवार यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली. जिल्हा परिषदेची नवीन भव्यदिव्य व देखणी इमारत साकारण्यातही त्यांचाच पुढाकार निर्णायक ठरला. मात्र, ज्या इमारतीच्या उभारणीसाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, त्याच इमारतीत उभारण्यात आलेल्या त्यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण आणि प्रवेशद्वार नामकरण समारंभाला दुर्दैवाने 'अजितदादा'च उपस्थित नव्हते. 

हा समारंभ अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते अजित पवार यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले. राज्य आणि देशाच्या राजकारणातील अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती या सोहळ्याला लाभली. एकेकाळी याच जिल्हा परिषदेतून राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींचा वेध घेणारे अनेक नेते या वास्तूत आले. अनेकांनी या इमारतीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाचा आढावा घेतला. मात्र, या सर्वांच्या उपस्थितीत एका व्यक्तीची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती. ती व्यक्ती म्हणजे अजित पवार ही होय. 

पुणे जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरावे, यासाठी अजित पवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे या वास्तूला आकार मिळाला. जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी, सदस्य, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ही इमारत केवळ प्रशासकीय कामकाजाची जागा नाही, तर अजित पवार यांच्या विकासदृष्टीची आठवण करून देणारी वास्तू ठरली आहे. अशा या वास्तूतच त्यांच्या अर्धपुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. 

या समारंभासाठी उपस्थित असलेल्या दिग्गजांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या कार्याचा गौरव शब्दात केला. त्यांच्या नेतृत्वाची चर्चा झाली. मात्र, या सगळ्या वातावरणात एक प्रश्न मनाला स्पर्श करून जात होता. ज्या अजित पवार यांनी या इमारतीसाठी प्रयत्न केले, ज्या 'अजितदादां'च्या संकल्पनेला या वास्तूत मूर्त स्वरूप मिळाले, तेच 'अजितदादा' या समारंभात का नव्हते?, अर्थात, काळाने त्यांना आपल्यातून हिरावून नेले आहे. त्यामुळे त्यांच्या अर्धपुतळ्याच्या अनावरणाचा हा क्षण उपस्थितांसाठी अभिमानाचा असला, तरी त्याचवेळी प्रत्येकाच्या मनाला हुरहूर लावणारा ठरला.

राजकारणात अनेक नेते येतात,जातात.अनेकांच्या हस्ते इमारतींचे उद्घाटन होते, अनेकांच्या उपस्थितीत स्मारकांचे अनावरण होते. पण एखाद्या व्यक्तीने ज्या संस्थेसाठी आणि वास्तूसाठी प्रयत्न केले, त्याच व्यक्तीचा अर्धपुतळा त्या वास्तूत उभारला जाणे आणि त्याच्या अनावरणावेळी ती व्यक्तीच नसणे, हा योग विलक्षण भावनिक आहे.

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, खासदार सुप्रिया सुळे, पार्थ पवार, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, बांधकाम सभापती दीपाली हुलावळे, कृषी सभापती अमोल नलावडे, महिला व बालकल्याण सभापती अंकिता पाटील, समाजकल्याण सभापती जितेंद्र बडेकर आदी उपस्थित होते. 

प्रारंभी जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी प्रास्ताविक केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. 

पुण्यातील रिंग रोडला अजित पवार यांचे नाव द्या- झेडपी अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची मागणी 

दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी आपल्या प्रास्ताविकात पुणे शहरासाठी उभारण्यात येत असलेल्या रिंग रोडला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. या रिंगरोडच्या उभारणीसाठी अजित पवार यांचे योगदान मोठे आहे. कारण त्यांनी अगदी यासाठी आवश्यक जमिनीच्या भूसंपादनापासून प्रत्यक्ष काम सुरू होईपर्यंत काम केले असल्याचे जगदाळे यांनी यावेळी सांगितले.