Memories of the late Ajit Pawar from Pune Zilla Parishad : पुणे जिल्हा परिषदेचे सर्वपक्षीय आजी-माजी सदस्य दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना देणार उजाळा!
येत्या १२ मार्चला पुणे जिल्हा परिषदेत अजित पवार यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन : सर्वपक्षीय माजी झेडपी पदाधिकारी उपस्थित राहणार
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ८ मार्च २०२६ :- महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मागील सुमारे अडीच दशकांपासून पुणे जिल्हा परिषदेशी जिव्हाळ्याचे संबंध होते.जिल्हा परिषद ही ग्रामीण विकासाशी निगडित पंचायतराज संस्था असल्याने पवार यांचे जिल्हा परिषदेच्या कामांवर खास लक्ष असायचे. पवार यांचे पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्यालयासह ग्रामीण भागातील अनेक सरकारी कार्यालयांच्या सुसज्ज व भव्यदिव्य इमारती उभारण्यात मोठे योगदान आहे. याशिवाय या अडीच दशकाच्या कालखंडात अजित पवार यांनी जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांवर मिळून अनेकांना पदाधिकारी व सदस्य म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. सध्या यापैकी अनेक जण विविध राजकीय पक्षात काम करत आहेत.
या पार्श्वभूमीवर पक्षीय राजकारण बाजूला ठेवून, पुण्याच्या ग्रामीण विकासात मोठे योगदान देणारे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे सर्वपक्षीय आजी-माजी सदस्य, पदाधिकारी एकत्र येणार आहेत.
यानुसार सर्वपक्षीय आजी-माजी सदस्य व पदाधिकाऱ्यांनी पवार यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेत श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी सांगितले.
ही श्रद्धांजली सभा पंचायतराजचे जनक स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी म्हणजेच येत्या १२ मार्चला सकाळी १० वाजता पुणे जिल्हा परिषदेच्या शरदचंद्र पवार सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या श्रद्धांजली सभेला पुणे जिल्हा परिषदेच्या सर्व आजी-माजी सदस्यांनी आणि माजी पदाधिकाऱ्यांना उपस्थित रहावे, असे आवाहनही शरद बुट्टे पाटील यांनी केले आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत ०८ जिल्हा परिषद अध्यक्ष, ०८ उपाध्यक्ष, विविध विषय समित्यांचे ३२ सभापती, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार गटनेते, जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांचे मिळून १०४ सभापती, १०४ उपसभापती, जिल्हा परिषदेचे सुमारे ३०० आणि पंचायत समित्यांच्या ६०० सदस्यांनी काम केलेले आहे.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम केलेले जिल्हा परिषद अध्यक्ष
- देवराम लांडे (जुन्नर)
- सतीश खोमणे (बारामती)
- वैशाली आबणे (दौंड)
- प्रा.सविता दगडे (मुळशी)
- दत्तात्रेय भरणे (इंदापूर)
- प्रदीप कंद (हवेली)
- विश्वास देवकाते (बारामती)
- निर्मला पानसरे (खेड)
जिल्हा परिषद उपाध्यक्ष
- सतीश खोमणे (बारामती)
- स्व. सुरेश गोरे (खेड)
- शरद लेंडे (जुन्नर)
- अरुण गिरे (आंबेगाव)
- प्रदीप कंद (हवेली)
- शुक्राचार्य वांजळे (हवेली)
- विवेक वळसे पाटील (आंबेगाव)
- रणजित शिवतरे (भोर)