Pune Zilla Parishad Late Ajit Pawar tribute : दिवंगत अजित पवार यांच्या निधनाने पुणे जिल्ह्याने 'विकासपुरुष' तर पुणे जिल्हा परिषदेने 'पालक' गमावला, आठवणींनी झेडपीचे सभागृहही गहिवरले! 

पुणे झेडपीच्या माजी पदाधिकारी व सदस्यांची पवार यांना श्रद्धांजली, झेडपी पोरकी झाल्याची भावना : अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना अनेकांचा कंठ दाटून आला

Pune Zilla Parishad Late Ajit Pawar tribute : दिवंगत अजित पवार यांच्या निधनाने पुणे जिल्ह्याने 'विकासपुरुष' तर पुणे जिल्हा परिषदेने 'पालक' गमावला, आठवणींनी झेडपीचे सभागृहही गहिवरले! 

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १२ मार्च २०२६ :- महाराष्ट्राचे दिवंगत नेते अजित पवार यांच्यामुळे पुणे जिल्हा परिषदेची इमारत कशी बांधली गेली, त्यासाठी त्यांनी काय काय प्रयत्न केले. एवढेच जिल्हा परिषद इमारतीच्या बांधकामावर आणि जिल्हा परिषदेच्या कामकाजावर त्यांचे कसे बारीक लक्ष असायचे. शिवाय जिल्हा परिषदेच्या नव्या पदाधिकारी निवडीत ते कसे बारकावे तपासून पाहत, याबाबतचे अजित पवार यांचे अनेक किस्से गुरुवारी (दि.१२ मार्च) पुणे जिल्हा परिषदेचे माजी पदाधिकारी, सदस्य, प्रशासकीय अधिकारी व सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी आदींनी जिल्हा परिषदेच्या शरदचंद्र पवार सभागृहात उलगडून सांगितले. मात्र हे किस्से ज्यांच्या बाबतीत घडले, ते अजित पवार हेच हे किस्से ऐकायला नव्हते. त्यामुळे हे किस्से सांगताना अजित पवार यांच्या अनुपस्थितीने  सर्वपक्षीय माजी झेडपी पदाधिकारी, सदस्य व अधिकाऱ्यांचे कंठ दाटून आल्याचे चित्र गुरुवारी पुणे जिल्हा परिषदेत पहावयास मिळाले. 

निमित्त होते,ते दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्रद्धांजली सभेचे. अजित पवार यांच्या निधनाने पुणे जिल्ह्याने 'विकासपुरुष' तर, पुणे जिल्हा परिषदेने 'पालक' गमावला आहे. यामुळे पुणे जिल्हा परिषद पोरकी झाली असल्याची भावना यावेळी श्रद्धांजली वाहताना अनेकांनी व्यक्त केली. 

महाराष्ट्रातील पंचायतराजचे जनक आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी पुणे जिल्हा परिषदेत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. पुणे जिल्हा परिषदेचे सर्वपक्षीय माजी पदाधिकारी, आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, आजी-माजी प्रशासकीय अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते. पुणे जिल्हा परिषदेच्या आजी-पदाधिकारी व सदस्यांच्यावतीने या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.

गेल्या ३५ वर्षात पुणे जिल्हा परिषदेमध्ये जबाबदारी सांभाळलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, विविध विषय समित्यांचे माजी सभापती आणि सर्व पक्षांचे जिल्हा परिषद सदस्य वआजी-माजी अधिकारी आवर्जून उपस्थित होते.पुणे जिल्हा परिषदेच्या गेल्या 30-35 वर्षाच्या वाटचालीमध्ये दिवंगत अजित पवार यांचे अतिशय मोठे योगदान असून त्यांच्याच माध्यमातून पुणे जिल्हा परिषदेला दरवेळी कोट्यावधी रुपयाचा निधी मिळाला. नवीन अधिकार आणि योजना मिळाल्या.झेडपीच्या मुख्यालयासह पुणे जिल्ह्यातील पंचायतराज क्षेत्रातल्या सर्व इमारती अजित पवार यांच्यामुळेच पूर्ण झाल्याचे यावेळी सर्व माजी अध्यक्षांनी सांगितले.

दिवंगत अजित पवार यांनी आमच्यासारख्या अनेक सामान्य कुटुंबातील तरुणांना जिल्हा परिषदेवर निवडून आणून पदाधिकारी केले. पुणे जिल्ह्यातील नवीन कार्यकर्त्यांची फळी घडविण्यामध्ये अजित पवार यांचे मोठे व महत्त्वाचे योगदान आहे. अशा भावना यावेळी माजी पदाधिकारी व  सदस्यांनी व्यक्त केल्या.

या श्रद्धांजली सभेत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, विजय कोलते, प्रदीप कंद, वैशाली आबणे, देवराम लांडे, माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, माजी सभापती मंगलदास बांदल, संभाजी होळकर, सुजाता पवार, जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, पुणे जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते श्रीमंत ढोले, शिवसेनेच्या गटनेत्या सुवर्णा दरेकर, बारामती पंचायत समितीचे सभापती किरण तावरे, शिवसेना जिल्हाप्रमुख व माजी सदस्य रमेश कोंडे, माजी सदस्या सविता बगाटे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिंगबर दुर्गाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, नृसिंह मित्रगोत्री, ज्येष्ठ पत्रकार पत्रकार शाम दौंडकर आदींनी अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून अनेक आठवणींना उजाळा दिला. 

जिल्हा परिषदेतील कर्मचारी आशिष जराड यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती शरद बुट्टे पाटील यांनी आभार मानले. या श्रद्धांजली सभेचे आयोजनामध्ये सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात,जिल्हा परिषद अध्यक्षांचे स्विय सहायक गिरीश ऊर्फ बाबा दिक्षित, सुरेंद्र सौदागर, जिल्हा परिषद कर्मचारी रेवलिंग यादव, संतोष शिंदे पवन एक्के आदींनी विशेष सहकार्य केले.
  
या सभेतील काही प्रमुख निर्णय 

- दिवंगत अजित पवार आणि पुणे  जिल्हा परिषद यासंदर्भाने विशेष पुस्तक प्रकाशित करणार.

- अजित पवार यांच्या स्मरणार्थ करावयाच्या विविध योजना, स्मारक आणि जिल्हा परिषदेच्या योजनांचे नामकरण करणार 

-  पुणे जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये वरील निर्णय घेण्याचा नवनिर्वाचित झेडपी सदस्यांचा निश्चय.