Pune ZP Sunil Bhapkar Award : पुणे जिल्हा परिषदेतील कनिष्ठ सहायक सुनील भापकर यांचा गुणवंत कर्मचारी पुरस्काराने गौरव!

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सुनील भापकर यांना पुरस्कार प्रदान 

Pune ZP Sunil Bhapkar Award : पुणे जिल्हा परिषदेतील कनिष्ठ सहायक सुनील भापकर यांचा गुणवंत कर्मचारी पुरस्काराने गौरव!
पुणे:- राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते राज्यस्तरीय गुणवंत कर्मचारी पुरस्कार सपत्नीक स्विकारताना पुणे जिल्हा परिषदेतील कनिष्ठ सहायक सुनील भापकर.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १३ मार्च २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागातील कनिष्ठ सहायक सुनील भाटकर यांना राज्याच्या  ग्रामविकास आणि पंचायतराज विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या यशवंतराव चव्हाण पंचायतराज अभियानांतर्गतच्या राज्यस्तरीय गुणवंत कर्मचारी पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते भापकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुणे जिल्हा परिषदेत कार्यरत असलेले सुनील भापकर हे माजी सैनिक आहेत. प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह आणि शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुणे येथे आयोजित एका समारंभात हा गौरव करण्यात आला. यावेळी मराठी अभिनेत्री व स्वच्छतादूत शिवाली परब, खासदार प्रा. मेधा कुलकर्णी, भोरचे आमदार शंकर मांडेकर, वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे, पुणे जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे आदींसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

भारतीय सैन्यदलात सेवा बजावत असताना सुनिल भापकर यांनी जम्मू-काश्मीरमधील दहशतवादविरोधी कारवायांमध्ये सहभाग घेतलेला आहे. ऑपरेशन सर्प विनाश, ऑपरेशन पराक्रम आणि कारगिल युद्धादरम्यान त्यांनी बजावलेली भूमिका उल्लेखनीय आहे. देशसेवेबरोबरच सरकारी सेवेतही त्यांनी प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कामांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा राज्यस्तरीय गुणवंत कर्मचारी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. सुनिल भापकर यांनी हा सन्मान आपल्या कुटुंबियांच्या उपस्थितीत स्विकारला.