Scholarship exam results : आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत तब्बल ४७ विद्यार्थी राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत झळकवणारी 'रणरागिणी'!
पुणे जिल्हा परिषदेची धानोरे शाळा शिष्यवृत्ती परीक्षेत ठरली राज्यात 'अव्वल' : शिक्षिका अनिता परदेशींच्या मार्गदर्शनाचा मोठा फायदा
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ५ जुलै २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेच्या धानोरे शाळेतील तब्बल ४७ विद्यार्थी हे इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य आणि जिल्हा गुणवत्तायादीत झळकले आहेत. या ४७ जणांपैकी १३ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत तर, अन्य ३४ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत झळकले आहेत. विशेष म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांना एकाच शिक्षिकेने मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे या शिक्षिका आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी खऱ्या रणरागिणी ठरल्या आहेत. अनिता परदेशी असे या शिक्षिकेचे नाव आहे.
या शिक्षिका जिल्हा परिषदेच्या धानोरे (ता.राजगुरूनगर) येथील शाळेत मागील तीन वर्षांपासून कार्यरत आहेत. याआधीची दोन वर्षे त्या इयत्ता पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मार्गदर्शन करत असत. गेल्या वर्षी पहिल्यांदाच त्यांनी धानोरे शाळेतील आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आणि पहिल्याच वर्षात त्यांनी त्यांच्या वर्गातील ४७ विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत झळकण्याची किमया साधली आहे.
याच शाळेतील इयत्ता पाचवी आणि आठवीच्या वर्गातील मिळून एकूण ६६ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत झळकले आहेत. यापैकी १९ जण पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आले आहेत. पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील १९ पैकी १ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत तर, अन्य १८ विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अनिता परदेशी यांनी तर, इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्चना सुतार, स्मिता माटे आणि दिप्ती पऱ्हाड या शिक्षिकांनी मार्गदर्शन केल्याचे या शाळेचे मुख्याध्यापक सत्यवान लोखंडे यांनी सांगितले. दरम्यान, या शाळेतील आर्या गोरख पारेकर या विद्यार्थ्यांनीने इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत एकूण ३०० पैकी २९४ गुण मिळवून, राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
राज्य गुणवत्ता यादीतील झळखलेले इयत्ता आठवीचे विद्यार्थी
- आर्या पारेकर --- २९४ गुण.
- सार्थक गावडे --- २८८ गुण.
- वैदवी कुडदुलवार --- २८८ गुण .
- सावनी टोपे --- २८६ गुण.
• कार्तिकी चव्हाण --- २८४ गुण.
- मंजिरी भुसुरी --- २८४ गुण.
• यश गायकवाड --- २८४ गुण.
• समृद्धी जाधव --- २८२ गुण.
• सोहम पायाळ --- २८० गुण.
• तेजस्विनी साबळे --- २७८ गुण.
• आर्यन पठारे --- २७४ गुण.
• समृद्धी लोखंडे --- २७४ गुण.
• श्रावणी बडोगे --- २७० गुण.
इयत्ता पाचवी राज्य गुणवत्ता यादी
- देवेंद्र टेकाळे --- २७६ गुण.
