Zilla Parishad Budget : पुणे जिल्हा परिषदेचा येत्या मंगळवारी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर होणार!
सलग चौथ्या वर्षी प्रशासक झेडपीचा अर्थसंकल्प सादर करणार: नव्या सभागृहासमोर अवलोकनार्थ ठेवणार
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १६ मार्च २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सलग चौथ्यांदा झेडपीचे प्रशासक सादर करणार आहेत. यानुसार जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील हे येत्या मंगळवारी (दि.१७ मार्च) पुणे जिल्हा परिषदेचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. येत्या मंगळवारी सकाळी ११ वाजता हा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. मात्र येत्या बुधवारी (दि. १८ मार्च)प्रशासकराज संपुष्टात येत असल्याने जिल्हा परिषदेच्या नव्या सभागृहासमोर हा अर्थसंकल्प अवलोकनार्थ सादर केला जाणार आहे.
यामुळे येत्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प प्रशासकांनी सादर केला असला तरी नव्या सभागृहाला त्यात दुरुस्त्या सुचविण्याची संधी मिळू शकणार आहे. जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील हे येत्या मंगळवारी (दि. १७ मार्च) आगामी आर्थिक वर्षाचा (२०२६-२७) मूळ अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेच्या मावळत्या सभागृहाचा कार्यकाल दि. २० मार्च २०२२ रोजी संपलेला आहे. त्यामुळे मावळत्या सभागृहातील पदाधिकारी व सदस्यांनी सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यानंतर जिल्हा परिषदेवर प्रशासकराज आल्याने सन २०२३-२४, सन २०२४-२५, सन २०२५-२६ आणि आता सन २०२६-२७ असे चार वर्षांचे वर्षनिहाय अर्थसंकल्प हे प्रशासकांनी सादर केले आहेत.
यानुसार प्रशासकराजमधील पहिला अर्थसंकल्प जिल्हा परिषदेचे पहिले प्रशासक व तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, दुसरा अर्थसंकल्प तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण आणि तिसरा व चौथा अर्थसंकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांना सादर करण्याची संधी मिळाली आहे.