Pune Zp BJP Group leader selection : जिल्हा परिषदेतील भाजपच्या गटनेतेपदी मुळशी तालुक्यातील झेडपी सदस्य शिवाजी बुचडे यांची निवड!
नवनिर्वाचित झेडपी सदस्यांच्या बैठकीत एकमताने निवड : भाजपच्या गटाची जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदणी
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १६ मार्च २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेतील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) गटनेतेपदी मुळशी तालुक्यातील हिंजवडी जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य शिवाजी बुचडे यांची सोमवारी (दि.१६ मार्च) निवड करण्यात आली. गटनेता निवडीनंतर भाजपच्या गटाची जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडे नोंदणी करण्यात आली. यामुळे मुळशी तालुक्याला दुसऱ्यांदा झेडपीतील गटनेतेपद मिळाले आहे. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य शांताराम इंगवले यांनी जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते म्हणून काम केले आहे.
भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या नवीन गटनेत्यांची निवड करण्यात आली. यावेळी भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे, भाजपचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गावडे, स्वाती पाचूंदकर, स्वरूपा थोपटे, दिपाली गव्हाणे, किरण साकोरे, हरिभाऊ लोळे, अविनाश कुदळे,अजय इंगळे आणि पोपटराव सुके आदी उपस्थित होते.
भाजपचे जिल्हा परिषदेतील नवनिर्वाचित गटनेते शिवाजी बुचडे भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांचे निकटवर्तीय आहेत. पुर्वीपासून ते संग्राम थोपटे यांच्यासोबत काम करत आहेत. थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर बुचडे यांनीसुद्धा थोपटे यांच्यासोबतच भाजपमध्ये प्रवेश केला आणि यंदा पहिल्यांदाच मुळशी तालुक्यातील हिंजवडी जिल्हा परिषद गटातून त्यांनी पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली आणि या पहिल्याच जिल्हा परिषद निवडणुकीत ते विजयी झाले आहेत.
दरम्यान, बुचडे यांनी याआधी मुळशी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून काम केले आहे. गटनेतेपदि निवड झाल्यानंतर शिवाजी बुचडे यांनी राजेश पांडे, प्रदीप कंद, संग्राम थोपटे आणि भाजपच्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांचे आभार मानले.