Kailashbuwa kale selection : जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कैलास काळे यांचे सभापतींच्या माध्यमातून १२ वर्षाच्या खंडानंतर झेडपीत पुनरागमन!
आंबेगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड : सभापतीपदी निवड होणारे जिल्ह्यातील एकमेव माजी झेडपी सदस्य
डॉ. गजेंद्र बडे :ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १० मार्च २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कैलासबुआ काळे यांची पुणे जिल्ह्यातील आंबेगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे. यंदा पंचायत समितीच्या सभापतीपदी निवड होणारे काळे हे पुणे जिल्ह्यातील एकमेव माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. सभापतीपदी निवड झाल्याने तब्बल १२ वर्षांच्या खंडानंतर कैलास काळे यांचे जिल्हा परिषदेच्या सभागृहात पुनरागमन झाले आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा १९६१ मधील तरतुदीनुसार पंचायत समितीचे सभापती हे पदसिद्ध जिल्हा परिषद सदस्य असतात. त्यामुळे कैलास काळे हे आता पुणे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य झाले आहेत. ते आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव या पंचायत समिती गणातून पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आले आहेत.
याआधी सन २००७ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव-पेठ या जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या तिकिटावर ते जिल्हा परिषदेवर निवडून आले होते. यानुसार सन २०१२ पर्यंत ते जिल्हा परिषद सदस्य होते. सन २०१२ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत ते आंबेगाव पंचायत समितीवर निवडून आले होते. त्यावेळी सुमारे दीड वर्ष ते पंचायत समितीचे सभापती होते. त्यामुळे ते सन २०१४ पासून राजकारणात सक्रिय होते. पण जिल्हा परिषदेच्या सभागृहात नव्हते.