ZP Administrator rule tenure : पुणे जिल्हा परिषदेच्या प्रशासकराजचा उरला शेवटचा एक दिवस, येत्या बुधवारी झेडपीला मिळणार नवे 'कारभारी'! 

त्रेहत्तराव्या घटनादुरुस्तीनंतर पहिल्यांदाच तब्बल ३ वर्ष ११ महिने २८ दिवसांच्या प्रशासकराज झेडपी इतिहासात नोंद 

ZP Administrator rule tenure : पुणे जिल्हा परिषदेच्या प्रशासकराजचा उरला शेवटचा एक दिवस, येत्या बुधवारी झेडपीला मिळणार नवे 'कारभारी'! 

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १६ मार्च २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेवर मागील सुमारे चार वर्षांपासून सुरू असलेल्या प्रशासकराजचा आता शेवटचा एक दिवस शिल्लक राहिला आहे. येत्या बुधवारी (दि. १८ मार्च) झेडपीचे नवे 'कारभारी' निवडले जाणार आहेत. त्यामुळे उद्याचा मंगळवार (दि.१७ मार्च) हा प्रशासकराजचा शेवटचा दिवस असणार आहे.

नव्या कारभाऱ्यांच्या निवडीनंतर लगेचच झेडपीतील प्रशासकराज संपुष्टात येणार आहे. दरम्यान, ७३ व्या घटनादुरुस्तीनंतर पहिल्यांदाच तब्बल ३ वर्ष ११ महिने २८ दिवस प्रदीर्घ काळाच्या प्रशासकराजची नोंद पुणे जिल्हा परिषदेच्या इतिहासात होणार आहे. 

महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच सन १९७९ मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक झाल्यानंतर तब्बल तेरा वर्षे पंचवार्षिक निवडणूक झाली नव्हती. यानुसार १९७९ नंतर थेट सन १९९२ मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची पंचवार्षिक निवडणूक झाली होती.

या निवडणुकीत प्रदीर्घ काळ खंड पडू नये आणि दर पाच वर्षांनी नियमितपणे पंचवार्षिक निवडणूक व्हावी, या उद्देशाने ७३ वी घटनादुरुस्ती दुरुस्ती करण्यात आली. या घटनादुरुस्तीची १९९४ पासून अंमलबजावणी सुरू झाली. मात्र तेव्हापासून सन २०२२ पर्यंत एकदाही जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर प्रशासकराज आले नव्हते. 

दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेच्या मावळत्या सभागृहाचा कार्यकाल दि. २२ मार्च २०२२ रोजी संपला आहे. तेव्हापासून आजतागायत म्हणजेच दि. १८ मार्च २०२६ असे एकूण ३ वर्षे ११ महिने २८ दिवस इतके प्रदीर्घ काळ जिल्हा परिषदेवर प्रशासकराज राहिले आहे.