Panchayat samiti precident election : पुणे जिल्ह्यातील ९ पंचायत समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस मारणार 'बाजी'! 

प्रत्येकी एका पंचायत समितीवर भाजप, शिवसेना व शिवसेना 'उबाठा'ची सत्ता : चिठ्ठीद्वारे ठरणार भोर पंचायत समितीचा नवा सभापती

Panchayat samiti precident election : पुणे जिल्ह्यातील ९ पंचायत समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस मारणार 'बाजी'! 

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ८ मार्च २०२६ :- पुणे जिल्ह्यातील तेरापैकी नऊ पंचायत समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.  उर्वरित चारपैकी भाजप, शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला प्रत्येकी एका पंचायत समितीत सत्ता मिळणार आहे. भोर पंचायत समितीचे सभापतीपद मात्र बहुमत नव्हे चिठ्ठी ठरविणार आहे. त्यामुळे ज्या पक्षाच्या नावाची चिठ्ठी निघेल, त्याच पक्षाला येथील सत्ता मिळणार आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्ह्यातील मावळ, बारामती, पुरंदर, आंबेगाव, वेल्हे, मुळशी, शिरुर, हवेली आणि इंदापूर या नऊ पंचायत समित्यांमध्ये सत्ता स्थापन होऊ शकणार आहे. दौंड पंचायत समितीवर भाजप, जुन्नर पंचायत समितीवर शिवसेना आणि खेड पंचायत समितीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची सत्ता स्थापन होऊ शकणार आहे.

भोर पंचायत समितीत मात्र भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी चार, अशा समान जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे या पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापती ही दोन्ही पदे चिठ्ठीद्वारे निश्चित करावी लागणार आहेत. 

जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांच्या मिळून एकूण १४६ जागा आहेत. यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे तब्बल ९३ सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठोपाठ भाजपचे २९, शिवसेनेचे १०, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ९ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ५ सदस्य आहेत.