Election of Panchayat Samiti Chairman :- पुणे जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे प्रशासकराज येत्या सोमवारी (दि. ९ मार्च) संपुष्टात येणार!

सभापती व उपसभापतींच्या येत्या सोमवारी निवडी : पुणे जिल्ह्यातील ७ पंचायत समित्यांवर 'महिलाराज' येणार 

Election of Panchayat Samiti Chairman :- पुणे जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे प्रशासकराज येत्या सोमवारी (दि. ९ मार्च) संपुष्टात येणार!

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १ मार्च  २०२६ :- पुणे जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांच्या नवीन सभापती व उपसभापतींची निवड येत्या सोमवारी (दि.९ मार्च) केली  जाणार आहे. या निवडीनंतर मागील सुमारे ३ वर्षे ११ महिने आणि २६ दिवसांपासून सुरू असलेले प्रशासकराज संपुष्टात येणार आहे. 

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा निकाल हा दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे निकालानंतर बरोबर १ महिन्याने नवे सभापती व उपसभापती निवडले जात आहेत. हे नवे पदाधिकारी निवडण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी असलेले तालुकानिहाय निवडणूक निर्णय अधिकारी हेच संबंधित तालुक्याच्या पंचायत समिती सभापती निवडणुकीचे 'पीठासन अधिकारी' म्हणून काम पाहणार आहेत. 

पुणे जिल्ह्यातील सर्वच्या सर्व १३ पंचायत समित्यांच्या मावळत्या सभागृहाचा कार्यकाल दि. १३ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आला होता. तेव्हापासून आजतागायत या सर्व पंचायत समित्यांवर प्रशासकराज सुरू आहे. 

कोणत्या पंचायत समितीवर कोण असणार सभापती

-  इंदापूर --- अनुसुचित जाती (एस.सी.) 

- जुन्नर --- अनुसुचित जमाती (महिला) 

- पुरंदर व दौंड --- नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) 

- शिरूर व मावळ --- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला).

- खुला गट (सर्वसाधारण) --- बारामती, आंबेगाव आणि हवेली. 

- खुला गट (महिला) --- भोर, वेल्हे, मुळशी आणि खेड.

पुणे जिल्ह्यातील ७ पंचायत समित्यांवर महिलाराज येणार 

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांपैकी ७ पंचायत समित्यांचे सभापतीपद हे विविध प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाले आहे. यापैकी खुल्या गटातील महिलांसाठी चार, नागरिकांच्या मागास प्रवर्गातील (ओबीसी) महिलांसाठी दोन तर, अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गातील महिलांसाठी १ सभापतीपद राखीव झाले आहे. सभापतीपद महिलांसाठी राखीव असलेल्या पंचायत समित्यांमध्ये जुन्नर, शिरूर, मावळ, भोर, वेल्हे, मुळशी आणि खेड या सात पंचायत समित्यांचा समावेश आहे.