Late Jalindar Kamthe Condolence Meeting : पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिवंगत जालिंदर कामठे यांची येत्या मंगळवारी पुण्यात तर, येत्या १० जुलैला झेडपीत श्रद्धांजली सभा!
पुण्यातील सुभद्रा कट्टा व जालिंदर कामठे मित्र परिवार आणि झेडपीच्या आजी-माजी सदस्यांकडून आयोजन
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ६ जुलै २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत जालिंदर कामठे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पुण्यात सुभद्रा कट्टा व जालिंदर कामठे मित्रपरिवार यांच्यावतीने तर, पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात झेडपीचे आजी माजी पदाधिकारी व सदस्यांच्या वतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे येथील श्रद्धांजली सभा ही येत्या मंगळवारी (दि.७ जुलै) दुपारी साडेतीन वाजता तर, जिल्हा परिषदेतील श्रद्धांजली सभा येत्या १० जुलैला आयोजित करण्यात आली आहे.
दिवंगत जालिंदर कामठे यांचे दि. १ जुलै रोजी ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. पुणे येथील डेक्कन जिमखाना येथे असलेल्या हॉटेल सुभद्रा येथील कट्टा सुरू करण्यात जालिंदर कामठे यांच्या सिंहाचा वाटा होता. मागील सुमारे ४० वर्षांपासून अखंडितपणे हा कट्टा चालू आहे. विविध क्षेत्रातील आणि विविध राजकीय पक्षातील नेते किमान आठवड्यातून एकदा सुभद्रा कट्ट्यावर एकत्रित येत असत आणि राजकारणविरहित चर्चा करत असत.
पुणे येथील नवी पेठेतील एस.एम. जोशी सभागृहातील श्रद्धांजली सभा ही दि. ७ जुलै २०२६ रोजी दुपारी साडेतीन वाजता सुरू होणार आहे. दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील श्रद्धांजली सभा ही दि. १० जुलै रोजी सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे.
मुळचे कोंढवा बुद्रुक (ता.हवेली) येथील रहिवासी असलेले जालिंदर कामठे यांनी कोंढवा येथे वसंतदादा पाटील प्रतिष्ठानची स्थापना केली होती. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शाळा, कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालय सुरू केलेले आहे.
