Mahada legal advisor selection : पुणे 'म्हाडा'च्या कायदेशीर सल्लागारपदी ॲड. संजय सावंत-पाटील यांची निवड!
विविध न्यायालयांत प्रलंबित असलेले 'म्हाडा'चे खटले चालविण्यासाठी नियुक्ती
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १६ मार्च २०२६ :- पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या (म्हाडा) कायदेशीर सल्लागारपदी ॲड.संजय दत्तात्रेय सावंत-पाटील यांची निवड करण्यात आली आहे. म्हाडाचे विविध न्यायालयांत प्रलंबित असलेले खटले चालविण्यासाठी ही निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील अनेक अनुभवी वकीलांकडून जिल्हा व सत्र न्यायालय, इतर न्यायालय, जिल्हा व राज्य ग्राहक न्यायालय, सहकार, महसूल न्यायालय, प्रशासकीय न्यायाधिकरण आणि अन्य न्यायालये, न्यायाधिकरण, प्राधिकरणासंदर्भातील दावे चालविण्यासाठी वकिलांचे पॅनल नियुक्त करण्यासाठी गेल्यावर्षी जुलै-ऑगस्टमध्ये अर्ज मागविण्यात आले होते. यानुसार नोव्हेंबर २०२५ मध्ये मुलाखती घेण्यात आल्या होत्या. यानुसार ॲड. संजय दत्तात्रेय सावंत यांची म्हाडा (MHADA) पुणे वकील पॅनलवर निवड करण्यात आली आहे.
ॲड. संजय सावंत पाटील हे सध्या महावितरण, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक (पी.डी.सी.सी.), पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जगदंब सामाजिक प्रतिष्ठान,येसूबाई सामाजिक प्रतिष्ठान आदी संस्थांवर कायदेशीर सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.
दरम्यान, ॲड. सावंत पाटील यांचा शासकीय, निमशासकीय, कंपनी, राजकीय, सामाजिक अनेक संस्था आणि वकिली व्यवसायातील सर्व प्रकारच्या कामाच्या अनुभवाची दखल घेऊन म्हाडाने ही निवड केली आहे. यासंदर्भात म्हाडाच्या पुणे विभागाचे मुख्याधिकारी राहुल साकोरे यांच्या सहीने म्हाडाचे पुणे विभागाच्या विधी विभागाचे सल्लागार अधिकारी डॉ. तुषार जाधव यांनी ॲड. सावंत पाटील यांना या निवडीचे पत्र दिले आहे. यावेळी म्हाडाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या निवडीनंतर ॲड. संजय दत्तात्रेय सावंत-पाटील यांनी पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे अध्यक्ष व माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, मुख्याधिकारी राहुल साकोरे, लिगल अँडव्हायजर अधिकारी असलेले डॉ. तुषार जाधव यांचे आभार मानले आहेत.