International women's day special: जागतिक महिलादिनी पुणे शहरातील शिक्षिकांची 'ग्लायडर'द्वारे गगनभरारी, आकाशी झेप घेत अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा! 

प्रसिद्ध पॅराशूट जेंपर शीतल महाजन यांची खास उपस्थिती :  ग्लायडिंग सेंटर, ग्रामराज्य आणि समग्र विकास फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने या अनोख्या उपक्रमाचे आयोजन 

International women's day special: जागतिक महिलादिनी पुणे शहरातील शिक्षिकांची 'ग्लायडर'द्वारे गगनभरारी, आकाशी झेप घेत अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा! 

संतोष गिराम : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ९ मार्च २०२६ :- जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पुणे शहरातील शिक्षिकांनी ग्लायडरद्वारे गगनभरारी घेतली. या भरारीच्या माध्यमातून आकाशी झेप घेत, या शिक्षिकांनी अनोख्या पद्धतीने जागतिक महिला दिन साजरा केला. अशा पद्धतीने साजरा केला गेलेला हा राज्यातील एकमेव प्रयोग ठरला आहे. या उपक्रमासाठी जगप्रसिद्ध पॅराशूट जेंपर शीतल महाजन यांची खास उपस्थिती लाभली. 

भारत सरकारचे पुण्यातील हडपसर येथील ग्लायडिंग सेंटर, देशातील पंचायतराज विषयाला वाहिलेले ग्रामराज्य हे मराठी न्यूज पोर्टल आणि समग्र विकास फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्लायडिंग सेंटरचे संचालक कॅप्टन शैलेश चारभे, भारत सरकारच्या खेल व क्रीडा मंत्रालयाच्या अखत्यारीत येत असलेल्या नेहरू युवा केंद्राचे माजी संचालक आणि समग्र विकास फाऊंडेशनचे कार्यकारी संचालक यशवंत मानखेडकर आणि पुणे येथील ग्रामराज्य न्यूज पोर्टलच्या संपादक प्रा. मीरा बडे आदी उपस्थित होते. 

पुणे येथील रसिकलाल एम. धारिवाल इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षिकांनी ग्लायडरद्वारे आकाशात भरारी घेत, जागतिक महिला दिन साजरा केला. यावेळी कॅप्टन चारभे यांनी पुणे येथील ग्लायडिंग सेंटरची संपूर्ण माहिती दिली. हा खुपच आगळावेगळा आणि अनोखा उपक्रम असल्याचे मत शिक्षिकांनी यावेळी प्रतिक्रिया देताना व्यक्त केले आणि ग्लायडिंग सेंटरचे संचालक कॅप्टन शैलेश चारभे यांचे आभार मानले.

अशा पद्धतीचे साहसी खेळ खेळण्याची संधी विद्यार्थ्यांना आणि महिलांना सातत्याने मिळणे गरजेचे आहे. कारण या खेळांमुळे युवा पिढी व महिलांमधील ताणतणाव आणि विद्यार्थ्यांमधील न्यूनगंड कमी होण्यास मदत होते, असे मत साहसी क्रीडा प्रकारात जागतिक पातळीवर विक्रम केलेल्या प्रसिद्ध पॅराशूट जेंपर शीतल महाजन यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

यावेळी शीतल कानडे, रुपाली पाटील, ऐश्वर्या  नायर, सलाजा नायर, मानसी मिश्रा, सुवर्णा कटियाल, संगीता निकुळे, सुनीता कानडे, शितल महाजन आणि  प्रा. मीरा बडे आदींनी जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या खास हवाई सफारीचा आनंद घेतला. ग्लायडरचे पायलट्स प्रशांत गोसावी, कॅप्टन श्रीनवास नयापती, कॅप्टन डॉ. विक्रम चौहान, कॅप्टन, रजत हांडा आणि प्रशिक्षणार्थी पायलट जयेश चव्हाण यांनी या हवाई सफारीचे सारथ्य केले. 

ग्लायडर सेंटरचे संचालक कॅप्टन शैलेश चारभे यांनी जगप्रसिद्ध पॅराशूट जेंपर शीतल महाजन आणि ग्रामराज्यच्या संपादक प्रा. मीरा बडे यांच्या हवाई सफारीचे सारथ्य केले. शीतल महाजन आणि मीरा बडे यांच्यासाठी ही मोठी संधी ठरली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्लायडिंग सेंटरचे कर्मचारी पंडित वानुके,दिगंबर पवार, महेश देशमुख,जितेंद्र गुरव आणि निखिल पेठे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्रारंभी यशवंत मानखेडकर यांनी या अनोख्या उपक्रमामागची भूमिका विशद केली. 

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दि. ७ नोव्हेंबर १९५० रोजी पुण्यातील ग्लायडिंग सेंटरचे उद्घाटन केले. यंदा ग्लायडिंग सेंटरचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. अमृतमहोत्सवी वर्षाच्या जागतिक महिला दिनी महिलांना ग्लायडरच्या हवाई सफारीची संधी मिळाली, ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे. युवा पिढीला हवाई क्षेत्रात प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने पंडित नेहरू यांनी ग्लायडिंग सेंटर्स सुरू केले. हाच उद्देश ठेवून महिलांसाठी ही हवाई सफर आयोजित केली. त्यामुळे आजही पंडित जवाहरलाल नेहरूंचा उद्देश यशस्वी होत आहे. 

- कॅप्टन शैलेश चारभे, 
संचालक, ग्लायडिंग सेंटर.

महिलांनी केवळ चूल आणि मूल इतक्या पुरतेच मर्यादित न राहता, साहसी क्रीडा प्रकारात सातत्याने सहभागी झाले पाहिजे. कारण महिला व युवती या मुळातच धाडसी असतात. त्यामुळे महिलांना सर्व क्षेत्रात जाता आले पाहिजे. 

- शीतल महाजन, 
प्रसिद्ध पॅराशूट जेंपर.