Selection in the shooting team : घोडेगावच्या देवांश काळे याची 'नेमबाजी'च्या महाराष्ट्र संघात निवड!
येत्या २६ व २७ मार्चला अखिल भारतीय स्तरावरील आंध्र प्रदेशात होणाऱ्या नेमबाजी स्पर्धेत सहभागी होणार
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १७ मार्च २०२६ :- पुणे जिल्ह्यातील घोडेगाव येथील इयत्ता सहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या देवांश महेंद्र काळे याची नेमबाजी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. या संघात निवड झालेला देशांश काळे हा पुणे जिल्ह्यातील एकमेव विद्यार्थी आहे. तो माजी खासदार आणि पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे (म्हाडा) अध्यक्ष शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आहे.
महाराष्ट्र आर्चरी धनुर्विद्या संघटनेतर्फे सोलापूर येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेद्वारे देवांश काळे याची महाराष्ट्र संघात नुकतीच निवड झाली आहे. या निवडीमुळे तो आता येत्या दि. २६ व २७ मार्च रोजी अखिल भारतीय स्तरावर आंध्र प्रदेशात होणाऱ्या आर्चरी धनुर्विद्या नेमबाजी स्पर्धेत भाग घेणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल देवांस काळे याचा लोहगाव ग्रामस्थांच्यावतीने माजी उपसरपंच प्रीतम प्रताप खांदवे-पाटील यांनी देवांशचा त्याचे आजोबा ज्येष्ठ पत्रकार श्याम दौंडकर यांच्या घरी जाऊन सत्कार केला आणि देवांशला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी श्रीराम लोटस सोसायटीचे अध्यक्ष भरत निंबाळकर, सचिव संदीप दौंडकर, जेष्ठ पत्रकार श्याम दौंडकर, ज्येष्ठ नागरिक सोमनाथ कारे, देवांशची आई विद्या महेंद्र काळे, दिव्या महेंद्र काळे, गणेश दौंडकर, दूर्वा दौंडकर हर्षवर्धन जितेंद्र काळे, शिल्पा दौंडकर, काजल दौंडकर आणि देवांशचा इतर परिवार उपस्थित होता.