Ex MLA Rambhau Moze passes away : माजी आमदार रामभाऊ मोझे यांचे निधन!
वयाच्या ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास : त्यांच्या पार्थिवावर संगमवाडी येथील स्मशानभूमीत सोमवारी सायंकाळी झाले अंत्यसंस्कार
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १३ जुलै २०२६ :- पुणे शहरातील तत्कालिन बोपोडी विधानसभा मतदारसंघाचे सलग तीन वेळा प्रतिनिधित्व करणारे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते रामभाऊ गेणबा मोझे यांचे सोमवारी (दि.१३ जुलै) वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी रुख्मिणी, दोन मुले, एक विवाहित मुलगी, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. संजय व ज्ञानेश्वर मोझे हे त्यांचे पूत्र होत.
दिवंगत रामभाऊ मोझे यांनी त्यांचे वडील आणि स्वातंत्र्यसैनिक गेनबा मोझे यांच्या नावाने शैक्षणिक संस्था स्थापन केली. या संस्थेमार्फत सध्या प्राथमिक व माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, वरिष्ठ महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालय आणि शिक्षणशास्त्र महाविद्यालय चालविण्यात येत आहेत. रामभाऊ मोझे हे सन १९७५ मध्ये कॉंग्रेसच्या उमेदवारीवर पहिल्यांदा पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांनतर सलग तीन वेळा नगरसेवक म्हणून काम केले. त्यांनी नगरसेवक असताना पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपदही भूषविले आहे.
त्यानंतर सन १९८५ मध्ये ते पहिल्यांदा तत्कालीन बोपोडी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. पुढे सलग तीन वेळा त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. ते गेणबा मोझे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांचे वडील गेणबा मोझे हेही पुणे महापालिकेचे नगरसेवक होते. रामभाऊ मोझे यांनी त्यांच्या जीवनात सामाजिक उत्तरदायित्वाला कायम महत्त्व दिले.दिवंगत रामभाऊ मोझे यांनी त्यांचे वडील, स्वातंत्र्य सैनिक गेणबा मोझे यांच्या नावाने बालेवाडी, चऱ्होली, वडगाव शेरी, येरवडा येथे शिक्षणसंस्था सुरू केल्या आहेत.
रामभाऊ मोझे यांनी केलेली लक्षवेधी विकासकामे
- मुठा नदी च्या डाव्या बाजूच्या पुणे शहरातील भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी मुठा डाव्या कालव्यात पाईपलाईन टाकली.
- या पाणी पुरवठ्यासाठी कर्वेनगर (कोपरे पुनर्वसन गावठाण )व खडकी येथे पाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारले.
- बाणेर ग्रामपंचायत असताना पहिल्यांदाबालेवाडी येथे पुणे महापालिकेची पिण्याच्या पाण्याची योजना कार्यान्वित केली.
- औंध येथील मुळा नदीवरील नवीन पूलासाठी आर्थिक नियोजन व मंजुरीचे काम.
- वाघोली प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ही वाघोली परिसरातील १४ गावांसाठी सुरू केली.
- विश्रांतवाडी येथे पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ५०० सदनिका उभारण्यासाठी शासकीय जागा मंजूर करुन घेतली.
