Late Jalindar Kamthe Condolence Meet : दिवंगत जालिंदर कामठे यांच्या निधनामुळे सुभद्रा कट्ट्याने मार्गदर्शक, सच्चा मित्र तर, पुणे जिल्ह्याने सामान्य कार्यकर्त्यांना बळ देणारा नेता गमावला!
सुभद्रा कट्ट्यावरील सर्वपक्षीय नेते आणि विविध क्षेत्रातील मित्र परिवाराने श्रद्धांजली सभेत जालिंदर कामठे यांच्या आठवणींना दिला उजाळा
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ८ जुलै २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत जालिंदर कामठे यांच्या अकाली निधनामुळे सुभद्रा कट्ट्याने एक सच्चा मार्गदर्शक तर, पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ देणारा एक नेता गमावला, अशी भावना सुभद्रा कट्ट्यावरील सर्वपक्षीय नेते आणि मित्रांनी मंगळवारी (दि. ७ जुलै) व्यक्त केली. जालिंदर कामठे यांच्या अकाली निधनामुळे मित्र परिवार, कुटुंब आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांची न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाल्याचे मत विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी जालिंदर कामठे यांना श्रद्धांजली अर्पण करताना व्यक्त केले. यावेळी उपस्थित मित्रांनी जालिंदर कामठे यांच्या आठवणींना उजाळा दिला.
पुण्यातील सुभद्रा कट्टा व जालिंदर कामठे मित्रपरिवार यांच्यावतीने मंगळवारी (दि.७ जुलै) रोजी दिवंगत जालिंदर कामठे यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. कामठे यांचे दि. १ जुलै रोजी ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. पुणे येथील डेक्कन जिमखाना येथे असलेल्या हॉटेल सुभद्रा येथील कट्टा सुरू करण्यात जालिंदर कामठे यांच्या सिंहाचा वाटा होता. शिवाय मागील सुमारे चाळीस वर्षांपासून या कट्ट्याचे मार्गदर्शक म्हणून जालिंदर कामठे काम करत असत.
या श्रद्धांजली सभेत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक मोहोळ, कॉंग्रेसचे नेते प्रशांत जगताप, संजय बालगुडे, संजय उभे, भाजप नेते दिलीप कांबळे, गणेश भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेश ढमढेरे,रमेश खांदवे, मुरलीधर निंबाळकर, मारुती किंडरे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, संचालक प्रविण शिंदे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल, शरद बुट्टे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अंकुश काकडे आदींनी जालिंदर कामठे यांना श्रद्धांजली अर्पण केली.
दिवंगत जालिंदर कामठे यांच्या स्मरणार्थ पुरस्कार सुरू करणार
दरम्यान, सुभद्रा कट्टा आणि जालिंदर कामठे मित्र परिवाराच्या वतीने दिवंगत जालिंदर कामठे यांच्या स्मरणार्थ पुरस्कार सुरू करण्यात येणार आहे. राजकीय क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कार्यकर्त्याला पुढील वर्षीपासून दिवंगत जालिंदर कामठे स्मृती पुरस्कार दिला जाणार असल्याचे मारुती किंडरे यांनी या सभेत बोलताना सांगितले.
जालिंदर कामठे यांच्यामुळे वाचले पक्षाचे तालुकाध्यक्ष पद : सुनील चांदेरे
दिवंगत जालिंदर कामठे हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ देणारे नेते होते. त्यामुळे त्यांनी कधीही नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये दरी निर्माण होऊ दिली नाही. नेता कितीही मोठा असला तरीही जालिंदर कामठे हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहत असत. त्यांच्या या गुणांमुळेच माझे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पद वाचले होते, अशी आठवण पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांनी यावेळी सांगितली.
जालिंदर कामठे यांना वर्गमित्राने दिले भाऊ हे टोपणनाव - संजय बालगुडे
दिवंगत जालिंदर कामठे यांनी मॉडर्न कॉलेजमध्ये अकरावीला विज्ञान शाखेत प्रवेश घेतला होता. परंतू, बारावीला त्यांनी विज्ञान शाखा सोडून वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला आणि तेव्हापासून आम्ही सर्व मित्र झालो. आमच्या बारावीच्या वर्गात असलेल्या दापोडी येथील राजेंद्र म्हसेकर या वर्गमित्राने बारावीत असतानाच जालिंदर कामठे यांना भाऊ हे टोपणनाव दिले आणि बारावीपर्यंत जालिंदर कामठे या नावाने ओळखले जाणारे कामठे हे जालिंदर भाऊ कामठे या नावाने ओळखले जाऊ लागले, अशी आठवण कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कामठे यांचे वर्गमित्र संजय बालगुडे यांनी यावेळी सांगितली.
