Relief for contractors from the CM : महाराष्ट्रातील शासकीय कंत्राटदारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दिलासा, थकीत देयकांसाठी मार्च २०२७ ची मुदत!

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर कंत्राटदारांचे नियोजित आंदोलन स्थगित : निधीची तरतूद असल्याशिवाय यापुढे निविदा काढणार नसल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Relief for contractors from the CM : महाराष्ट्रातील शासकीय कंत्राटदारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दिलासा, थकीत देयकांसाठी मार्च २०२७ ची मुदत!
नागपूर:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध मागण्यांचे निवेदन देताना राज्यातील कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे पदाधिकारी.

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २५ नोव्हेंबर २०२६ :- महाराष्ट्रातील विविध सरकारी विभागांकडे राज्यातील कंत्राटदारांची प्रलंबित असलेली कोट्यवधी रुपयांची देयके आणि कंत्राटदारांच्या अन्य प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक तोडगा काढण्यात येईल.  यानुसार सर्व कंत्राटदारांची प्रलंबित देयके ही येत्या मार्च अखेरपर्यंत अदा केली जातील आणि यापुढे निधीची उपलब्धता असल्याशिवाय कोणतीही निविदा काढली जाणार नाही,असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कंत्राटदारांना दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनानंतर महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर फेडरेशनच्या वतीने येत्या हिवाळी अधिवेशनादरम्यान करण्यात येणारे नियोजित आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील शासकीय कंत्राटदारांची विविध सरकारी विभागांकडील प्रलंबित देयके, जलजीवन मिशनची थकबाकी तसेच सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांचे प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच (दि. २३ नोव्हेंबर २०२६) नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि कंत्राटदारांच्या समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी झालेल्या चर्चेत कंत्राटदारांच्या आर्थिक अडचणी आणि प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला फेडरेशनचे कार्याध्यक्ष प्रवीण उंबरकर, विदर्भ विभागीय संघटक सुबोध सरोदे, जनरल सेक्रेटरी नितीन साळवे, मानद संचालक संजय मैंद,उपाध्यक्ष रवींद्र चव्हाण, संचालक इरशाद नवाब यांच्यासह अन्य मान्यवर कंत्राटदार उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती फेडरेशनचे संचालक आणि पुणे जिल्हाध्यक्ष रवींद्र भोसले यांनी दिली.  सर्व कंत्राटदारांनी या निर्णयाबाबत सहकार्य करावे, असे आवाहनही भोसले यांनी केले आहे.

"आदिवासी विकास विभागाची देयके येत्या मार्चपर्यंत देण्याचा प्रयत्न"

यावेळी या शिष्टमंडळाने आदिवासी विकास विभागाकडील प्रलंबित देयकांचा प्रश्न प्रामुख्याने उपस्थित केला. राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे निधी उपलब्धतेमध्ये अडचणी येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र, हिवाळी अधिवेशनात जास्तीत जास्त निधीची तरतूद करून डिसेंबर २०२६ ते मार्च २०२७ या कालावधीत प्रलंबित देयके अदा करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी यावेळी सांगितले.

जलजीवन मिशनची थकबाकीही लवकरच मिळणार

जलजीवन मिशनअंतर्गत पूर्ण केलेल्या कामांची प्रलंबित देयके मिळत नसल्याने कंत्राटदार आर्थिक अडचणीत आले आहेत. या सर्व प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही देयके अदा करण्याचे नियोजन यापूर्वीच करण्यात आले असून, उर्वरित संपूर्ण देयकेही लवकरात लवकर देण्यात येतील, असे आश्वासन दिले.

सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी स्वतंत्र निधीची मागणी

या बैठकीत राज्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या विविध प्रश्नांवरही बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. राज्यातील सर्व शासकीय विभागांमध्ये सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी एकच नोंदणी व्यवस्था असावी, जिल्हा परिषद  व पंचायत समित्यांतर्गत मंजूर होणारी एक कोटी रुपयांपर्यंतची कामे या अभियंत्यांसाठी राखीव ठेवावीत, तसेच त्यांच्या कामांसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करावी, अशा मागण्या यावेळी फेडरेशनच्यावतीने करण्यात आल्या. या मागण्यांबाबत फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेण्याचे आश्वासनही दिल्याचे पुणे कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र भोसले यांनी यावेळी सांगितले.