Zp member training: पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य गिरवू लागले सभागृहातील संभाषण कौशल्याचे 'धडे'!
'यशदा'त तीन दिवसीय प्रशिक्षण सुरू : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते उद्घाटन
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २८ एप्रिल २०२६ :- जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत कसे बोलावे, सभागृहाचे कामकाज चालू असताना कोणती खबरदारी घ्यावी, विषय मांडण्याची पद्धत काय, सभागृहातील कामकाजाचे नियम काय आणि कामकाज चालू असताना कोणती नितीमूल्ये जपली पाहिजेत, याबाबतचे धडे पुणे जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य गिरवू लागले आहेत.
पुणे जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांचे तीन दिवसीय प्रशिक्षण सोमवारपासून पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीत (यशदा) सुरू करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचे उद्घाटन राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, 'यशदा'चे महासंचालक डॉ. सुहास दिवसे, उपमहासंचालक शेखर गायकवाड, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदी उपस्थित होते.
हे प्रशिक्षण येत्या बुधवारपर्यंत (दि.२९ एप्रिल) चालणार आहे. या तीन दिवसांच्या प्रशिक्षणात नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांना जिल्हा परिषदेचे कामकाज, विविध विषय समित्या आणि सर्वसाधारण सभेतील कामकाजाचे नियम, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा १९६१ मधील तरतुदी, सदस्यांचे अधिकार, जिल्हा नियोजन समितीच्या आणि जिल्हा परिषद परस्पर संबंध, ग्रामीण भागाच्या विकासासाठी असलेल्या केंद्र व राज्य सरकारच्या योजना, जिल्हा परिषद सदस्यांनी घ्यावयाची काळजी आदींबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात पंचायत समिती सभापती व सदस्यांना प्रशिक्षण देणार
दरम्यान, पहिल्या टप्प्यात फक्त जिल्हा परिषदेचे नवनियुक्त पदाधिकारी आणि सदस्यांसाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. यामधून जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असलेल्या पंचायत समित्यांच्या सभापतींना वगळण्यात आले आहे. मात्र दुसऱ्या टप्प्यात पुणे जिल्हा सर्व पंचायत समित्यांचे सभापती आणि सदस्यांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात यांनी सांगितले.
पंचायत समितीच्या सभापतींना झेडपी सदस्यांबरोबरच प्रशिक्षण हवे - युवराज काकडे
पंचायत समित्यांचे सभापती हे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात. त्यामुळे सभापतींना पंचायत समितीबरोबरच जिल्हा परिषद सभागृहातील कामकाजाची माहिती असायला हवी. त्यामुळे पंचायत समित्यांच्या सर्व सभापतींना जिल्हा परिषदेच्या सदस्यां- बरोबरच प्रशिक्षण मिळाले हवे होते, असे मत हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे यांनी व्यक्त केले आहे.
