Pune Zp committee precident distribution : पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य सभापतीपदी मावळ तालुक्यातील दीपाली हुलावळे तर, कृषी व पशुसंवर्धन सभापतीपदी वेल्हे तालुक्यातील अमोल नलावडे! 

अध्यक्ष विरधवल जगदाळे यांच्याकडून विषय समित्यांचे वाटप : उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील अर्थ व शिक्षण खात्याची जबाबदारी

Pune Zp committee precident distribution : पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य सभापतीपदी मावळ तालुक्यातील दीपाली हुलावळे तर, कृषी व पशुसंवर्धन सभापतीपदी वेल्हे तालुक्यातील अमोल नलावडे! 

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १६ एप्रिल २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीच्या सभापतीपदाची जबाबदारी मावळ तालुक्यातील दीपाली हुलावळे यांच्याकडे तर, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापतीपदाची जबाबदारी वेल्हे जिल्हा अमोल नलावडे यांच्याकडे गुरुवारी (दि.१६ एप्रिल) सोपविण्यात आली. उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांच्याकडे अर्थ व नियोजन आणि शिक्षण विभागाची जबाबदारी देण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी गुरुवारी विविध सहा विषय समित्यांच्या सभापती पदांचे वाटप केले. यावेळी तीन सभापतींना प्रत्येकी दोन विषय समित्यांच्या सभापती पदाची जबाबदारी देण्यात आली.

दरम्यान, उर्वरित दोन विषय समितीच्या सभापतीपदी मावळ तालुक्यातील खडकाळे जिल्हा परिषद गटातून निवडून आलेल्या दीपाली हुलावळे आणि वेल्हे तालुक्यातील विंझर जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले अमोल नलावडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या दोन सभापतींना विषय समित्यांचे वाटप करण्याचे अधिकार जिल्हा परिषद अध्यक्षांना आहेत. यानुसार या दोन्ही सभापतींना येत्या १६ एप्रिलला विषय समित्यांचे वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी यावेळी केली.

जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या नवनिर्वाचित चार सभापतींची दि.२ एप्रिल रोजी निवड करण्यात आली होती. यावेळी याआधीच महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी इंदापूर तालुक्यातील अंकिता पाटील-ठाकरे आणि समाजकल्याण समितीच्या सभापतीपदी हवेली तालुक्यातील जितेंद्र बडेकर यांची निवड करण्यात आली होती. दरम्यान, त्याआधीच जिल्हा परिषद अध्यक्षपदी दौंड तालुक्यातील विरधवल जगदाळे आणि उपाध्यक्षपदी आंबेगाव तालुक्यातील विवेक वळसे-पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती. 

उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांच्यासह तीन पदाधिकारी गुरुवारपर्यंत बिनखात्यांचे सभापती म्हणून कार्यरत होते. या तीनही पदाधिकाऱ्यांना गुरुवारी अधिकृतपणे विषय समित्यांच्या सभापती पदांचे वाटप करण्यात आले. अध्यक्ष विरधवल जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सर्वसाधारण सभेत हे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील,  अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे आणि सर्व खातेप्रमुख आदी उपस्थित होते.

झेडपीच्या इतिहासात बांधकाम सभापतीपदी पहिल्यांदाच महिलेला संधी 

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीच्या सभापतीपदी जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून (सन १९६२) आजतागायत म्हणजेच या ६४ वर्षांच्या कालखंडात एकाही महिलेला बांधकाम व आरोग्य समितीच्या सभापतीपदी संधी मिळाली नव्हती. यंदा पहिल्यांदाच या समितीच्या सभापतीपदी दीपाली हुलावळे यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या महिला महिला बांधकाम सभापती होण्याचा मान दीपाली हुलावळे यांनी पटकावला आहे.