Late Ajit Pawar bust at Pune Zp : पुणे जिल्हा परिषदेत स्व.अजित पवार यांचा अर्धपुतळा : झेडपीच्या मुख्य प्रवेशद्वाराला अजित पवार यांचे नाव देणार!
पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची माहिती : उद्या अजित पवार यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १५ नोव्हेंबर २०२६ :- महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अजित पवार यांच्या स्मृती जपण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. यानुसार पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात दिवंगत अजित पवार यांच्या अर्धपुतळा उभारण्यात आला आहे. शिवाय झेडपी मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला अजित पवार यांचे नाव देण्यात आले आहे. या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण व प्रवेशद्वाराचे नामकरण येत्या सोमवारी (दि.१६ नोव्हेंबर) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते केले जाणार आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना याबाबतची माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, बांधकाम समितीच्या सभापती दीपाली हुलावळे, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अमोल नलावडे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अंकिता पाटील आणि समाजकल्याण सभापती जितेंद्र बडेकर आदी यावेळी उपस्थित होते.
या अर्धपुतळा अनावरण कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, एकनाथ शिंदे, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष व खासदार शरद पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आदी उपस्थित राहणार आहेत.
पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात अजित पवार यांचे योगदान मोठे आहे. विशेषतः जिल्हा परिषद आणि ग्रामीण विकासाच्या कामकाजाशी त्यांचे जवळचे नाते होते. त्यांच्या कार्याचे स्मरण आणि भावी पिढीला लोकसेवेची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने पुणे जिल्हा परिषदेच्या आवारात त्यांचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वाराला त्यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
दरम्यान, या पुतळा अनावरण समारंभात दिवंगत अजित पवार यांच्या जीवनकार्यावर आधारित कॉफी टेबल बुकचे प्रकाशन केले जाणार आहे. तसेच अजित पवार यांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या लघुपटाचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.
झेडपी अध्यक्ष वीरधवल जगदाळे ठरले झेडपीतील दोन ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार : 'सदस्य ते अध्यक्ष' असा दुर्मिळ योगायोग!
पुणे जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या ऐतिहासिक लोकार्पण सोहळ्यापासून ते दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्धपुतळ्याच्या ऐतिहासिक अनावरण सोहळ्यापर्यंतचा प्रवास हा जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्यासाठी अत्यंत अभिमानास्पद ठरला आहे. या वास्तूचे उद्घाटन झाले, तेव्हा ते जिल्हा परिषदेचे 'सदस्य' या नात्याने या उद्घाटन समारंभाला उपस्थित होते. आज त्याच वास्तूमध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण होत असताना, तेच आता याच जिल्हा परिषदेचे 'अध्यक्ष' या नात्याने या ऐतिहासिक क्षणाचे नेतृत्व करत आहेत. एकाच इमारतीतील दोन मोठ्या सोहळ्यांना दोन वेगवेगळ्या आणि महत्त्वाच्या भूमिकांतून उपस्थित राहण्याचा हा एक सुखद आणि दुर्मिळ योगायोग अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्या बाबतीत घडून आला आहे.
‘ग्रामविकासाचे दीपस्तंभ अजितदादा’ : वीरधवल जगदाळे
या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी अजित पवार यांच्या कार्याचा गौरव केला आहे. पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात त्यांचे योगदान मोलाचे असून, त्यांच्या कार्याचे सदैव स्मरण राहावे आणि त्यांच्या लोकसेवेच्या कार्याला अभिवादन व्हावे, या उद्देशाने हे स्मारक उभारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हे स्मारक लोकसेवेसाठी समर्पणाची प्रेरणा देणारे ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी अजित पवार यांच्या प्रशासकीय शिस्तीचा उल्लेख केला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी प्रशासन लोकाभिमुख करण्याला प्राधान्य दिले. कोणतेही काम करताना नागरिकांना केंद्रस्थानी ठेवावे, ही शिकवण अजित पवार यांच्याकडून मिळाली. त्यांची ही शिकवण कायम स्मरणात ठेवण्यासाठी हे स्मारक प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कारकिर्दीला ग्रामविकासाचा मार्गदर्शक आदर्श परिपाठ म्हणता येईल.अजित पवार यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात परिवर्तन घडविण्यासाठी त दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. त्यांचे स्मारक भविष्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक व दिशादर्शक ठरेल, असे मत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांनी व्यक्त केले आहे.
