Pune Zp Jyoti-Savitri school inauguration : पुणे झेडपीचा खानवडीचा कार्यक्रम पोलीस अन् प्रशासनाकडून 'हायजॅक'; आयोजक झेडपी पदाधिकारी व सदस्यांना दुय्यम वागणूक!   

झेडपीच्या कार्यक्रमात ढिसाळ नियोजनामुळे सावळा गोंधळ :  झेडपी सदस्यांवर कार्यक्रमाच्या बाहेर राहण्याची तर पदाधिकाऱ्यांवर व्यासपीठाच्या खाली बसण्याची नामुष्की 

Pune Zp Jyoti-Savitri school inauguration : पुणे झेडपीचा खानवडीचा कार्यक्रम पोलीस अन् प्रशासनाकडून 'हायजॅक'; आयोजक झेडपी पदाधिकारी व सदस्यांना दुय्यम वागणूक!   

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ११ एप्रिल २०२६ :-  पुणे जिल्हा परिषदेच्या जोती सावित्री जिल्हा परिषद शाळेच्या उद्घाटनाचा शनिवारचा (दि.११ एप्रिल) कार्यक्रम पोलिस आणि प्रशासनाने चक्क 'हायजॅक' केल्याचे चित्र पहावयास मिळाले. या कार्यक्रमात खुद्द आयोजक असलेल्या जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्यांनाच दूय्यम वागणूक मिळाली. यामुळे पदाधिकारी व सदस्यांना त्यांच्या कार्यकाळातील पहिल्याच आणि तोही स्वतः:च्याच कार्यक्रमात परकेपणा जाणवला. या कार्यक्रमात चक्क पदाधिकाऱ्यांवर व्यासपीठाच्या खाली बसण्याची तर, सदस्यांवर कार्यक्रमाच्या बाहेर राहण्याची वेळ आली. यामुळे सर्वपक्षीय जिल्हा परिषद सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे जोती सावित्री जिल्हा परिषद शाळेची उभारणी करण्यात आली आहे. थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (दि.११ एप्रिल) या शाळेचे उद्घाटन आयोजित करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात येणार होते. यासाठी सर्वपक्षीय जिल्हा परिषद सदस्यांना निमंत्रित करण्यात आले होते. तसं पाहिलं तर, या कार्यक्रमाचे आयोजक पुणे  जिल्हा परिषद होती. त्यामुळे पदाधिकारी व सदस्यांच्या दृष्टीने हा त्यांच्या घरचाच कार्यक्रम. परंतू, स्वतःच्याच कार्यक्रमात परके होण्याची वेळ शनिवारी पदाधिकारी व जिल्हा परिषद सदस्यांवर आली आहे. 

या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद शाळांमधील सर्व शिक्षक, ग्रामसेवक,अंगणवाडी सेविका, मदतनीस आदींना श्रोते म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. शिवाय पुणे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती बंधनकारक करण्यात आली होती. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आवश्यक असलेले सरकारी ओळखपत्र होते. त्यामुळे या सर्वांना या कार्यक्रमाच्या स्थळी पोहोचवण्यासाठी कसलीही अडचण आली नाही. दरम्यान, या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आवश्यक असलेले पास जिल्हा परिषद सदस्यांना देण्यात आलेले नव्हते. त्यामुळे अनेक जिल्हा परिषद सदस्यांना अक्षरशः कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्यास पोलिसांकडून मज्जाव करण्यात आला. यामुळे अनेक सदस्यांवर कार्यक्रमापासून दूर राहण्याची वेळ आली. 

दिवंगत अजित पवार यांचा विसर 

पुरंदर तालुक्यातील खानवडी येथील जोती सावित्री जिल्हा परिषद शाळेच्या उभारणीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठे योगदान आहे. या शाळेसाठी सरकारी जमिन उपलब्ध करून देणे, जिल्हा नियोजन समितीतून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणे आणि आवश्यक परवानग्या मिळवून देण्याचे काम पालकमंत्री या नात्याने दिवंगत अजित पवार यांनी केलेले आहे. परंतू, शनिवारच्या या शाळेच्या उद्घाटनान समारंभात अजित पवार यांचे छायाचित्र लावण्यात आलेले नव्हते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या पहिल्याच कार्यक्रमात अजित पवार यांचा जिल्हा परिषदेला विसर पडल्याचे दिसून आले. 

समाजकल्याण सभापती जितेंद्र बडेकर यांच्याकडून निषेध 

खानवडीच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेच्या उभारणीत सिंहाचा वाटा असलेल्या दिवंगत अजित पवार यांची प्रतिमा या शाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात व्यासपीठावर ठेवणे आवश्यक होते, असे मत समाजकल्याण सभापती जितेंद्र बडेकर यांनी व्यक्त केले आणि या घटनेचा निषेध म्हणून व्यासपीठावर जाणार नसल्याचे बडेकर यांनी कार्यक्रमस्थळीच जाहीर केले. ज्या दिवंगत नेत्याचे या शाळेच्या उभारणीत योगदान आहे, त्याच नेत्यांना विसरणार असाल तर, व्यासपीठावर बसणार नाही, असे स्पष्ट करत, जितेंद्र बडेकर यांनी व्यासपीठावर जाण्यास नकार दिला. 

झेडपीचे एक गटनेतेही पोलिसांच्या धक्काबुक्कीपासून थोडक्यात बचावले 

कार्यक्रमस्थळी साध्या वेशातील पोलिसांची संख्या जास्त होती. शिवाय पुरंदर विमानतळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे कोणी निदर्शने करु नये किंवा काळे झेंडे दाखवू नयेत, याची खबरदारी पोलिसांकडून घेण्यात येत होती. त्यामुळे पास किंवा ओळखपत्र असल्याशिवाय अन्य कोणालाही आत प्रवेश दिला जात नव्हता. जिल्हा परिषद सदस्यांकडे पास किंवा ओळखपत्र यापैकी काहीही नव्हते. त्यामुळे पोलिस जिल्हा परिषद सदस्यांना कार्यक्रमस्थळी जाण्यास मज्जाव करत होते. या पार्श्वभूमीवर एका राजकीय पक्षाच्या जिल्हा परिषदेतील गटनेत्याने पोलिसांना याबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी या गटनेत्याला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. परंतू, उपस्थितांच्या मध्यस्थीनंतर हा प्रसंग टळला. 

झेडपी पदाधिकारी व सदस्यांना पहिल्याच कार्यक्रमात जाणवली अजित पवार यांची उणीव 

दिवंगत उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री अजित पवार हे पुणे जिल्हा परिषदेच्या सर्व कार्यक्रमात जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्यांना मोठे मानाचे स्थान देत असत. यानुसार दिवंगत अजित पवार हे झेडपीच्या कार्यक्रमात सर्व पदाधिकाऱ्यांना व्यासपीठावर पहिल्याच रांगेत आणि तेही त्यांच्या आजूबाजूला स्थान देत असत. या कार्यक्रमाचे खरे मानकरी हे जिल्हा परिषद पदाधिकारी आहेत. त्यामुळे त्यांचा मान त्यांना मिळालाच पाहिजे, याची खबरदारी अजित पवार घेत असत. दिवंगत अजित पवार यांच्या अनुपस्थितीत झालेला पुणे जिल्हा परिषदेचा खानवडीचा हा पहिलाच कार्यक्रम. या पहिल्याच कार्यक्रमात खऱ्या मानकऱ्यांवरच व्यासपीठापासून आणि कार्यक्रमापासून दूर राहण्याची वेळ आली. यामुळे सर्व पदाधिकारी व सदस्यांना शनिवारी अजित पवार यांची उणीव जाणवली. 

अध्यक्ष एका कोपऱ्यात तर, उपाध्यक्ष तिसऱ्या रांगेत 

दरम्यान, या कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे आणि उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील व अन्य दोन सभापतींना व्यासपीठावर स्थान देण्यात आले होते. परंतू, या पदाधिकाऱ्यांना व्यासपीठावरही दूय्यम स्थान देण्यात आल्याचे चित्र पहावयास मिळाले. अध्यक्ष विरधवल जगदाळे यांना पहिल्या रांगेत एका कोपऱ्यात तर, उपाध्यक्ष व जिल्हा परिषदेच्या शिक्षण खात्याची धूरा सांभाळणारे विवेक वळसे-पाटील यांना तिसऱ्या रांगेत स्थान देण्यात आले. 

दोन सभापती व्यासपीठाच्या व्यासपीठाच्या खालीच

याशिवाय जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाचे सभापती जितेंद्र बडेकर आणि अन्य एका विषय समितीचे सभापती अमोल नलावडे यांना व्यासपीठाच्या खाली श्रोत्यांमध्ये बसावे लागले. दरम्यान, ही चूक लक्षात आल्यानंतर या दोन्ही सभापतींना व्यासपीठावर बोलाविण्यात आले. परंतू, या दोन्ही सभापतींनी तीव्र नाराजी व्यक्त करत व्यासपीठावर जाण्यास स्पष्ट नकार दिला.