Acting Block Education Officer Suspended : पुणे जिल्हा परिषदेच्या खानवडी शाळेच्या उद्घाटनानंतर पाचच दिवसांत प्रभारी गट शिक्षणाधिकाऱ्याचा पहिला 'बळी'! 

झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्याकडून प्रभारी गटशिक्षणाधिकारी गोविंद लाखे निलंबित : शाळेच्या बाबतीत चुकीची माहिती दिल्याचा ठपका

Acting Block Education Officer Suspended : पुणे जिल्हा परिषदेच्या खानवडी शाळेच्या उद्घाटनानंतर पाचच दिवसांत प्रभारी गट शिक्षणाधिकाऱ्याचा पहिला 'बळी'! 
पुणे:- ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळा खानवडी.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १७ एप्रिल २०२६ :- पुणे जिल्हा परिषद वतीने पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे सुरू करण्यात आलेल्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) जोती सावित्री जिल्हा परिषद शाळेच्या उद्घाटनानंतर अवघ्या पाचच दिवसांत एका शिक्षण अधिकाऱ्याला निलंबित करण्याची वेळ पुणे जिल्हा परिषदेवर आली आहे. या शाळेच्या बाबतीत चुकीची माहिती दिल्याचा ठपका ठेवत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी पुरंदरचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी गोविंद लाखे यांना गुरुवारी (दि.१६ एप्रिल) निलंबित केले आहे. 

या शाळेचे उद्घाटन पाचच दिवसांपूर्वी म्हणजेच दि. ११ एप्रिल २०२६ रोजी करण्यात आले होते. पुरंदरचे निलंबित प्रभारी गट शिक्षणाधिकारी गोविंद लाखे हे सध्या पुरंदर पंचायत समितीत शिक्षण विस्तार अधिकारी या पदावर कार्यरत होते. परंतू, येथील गट शिक्षणाधिकारी हे पद रिक्त असल्याने लाखे यांच्याकडे गट शिक्षणाधिकारी या पदाचा प्रभारी पदभार देण्यात आला होता.

मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी लाखे यांच्यावर महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ मधील नियम ३(१) अंतर्गत निलंबनाची ही कारवाई केली आहे. निलंबित प्रभारी गट शिक्षणाधिकारी गोविंद लाखे यांनी खानवडी येथील जोती सावित्री शाळेला भेट दिल्यानंतर बाहेर चुकीची माहिती बाहेर प्रसारित केली. यामुळे जिल्हा परिषद संस्थेची बदनामी झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे लाखे यांना निलंबित करण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सांगितले. 

दरम्यान, निलंबनानंतर लाखे यांना वेल्हे पंचायत समिती हे मुख्यालय देण्यात आले असून, गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, असे या निलंबन आदेशात नमूद करण्यात आले आहे.