Zp Teachers Association Federation Meeting : महाराष्ट्रातील झेडपीच्या शाळा टिकल्या पाहिजेत; यासाठी शिक्षकांच्या मागण्यांच्या पुर्ततेसाठी प्रयत्न करु! 

आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांचे शिक्षकांना आश्वासन : राज्य प्राथमिक शिक्षक संघाची महामंडळ सभा संपन्न 

Zp Teachers Association Federation Meeting : महाराष्ट्रातील झेडपीच्या शाळा टिकल्या पाहिजेत; यासाठी शिक्षकांच्या मागण्यांच्या पुर्ततेसाठी प्रयत्न करु! 

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १३ जून २०२६ :- राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये मिळणारे संस्कार हे जीवन जगण्यासाठी दिशा देत असतात. त्यामुळे राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळा टिकणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांचे मनोधैर्य टिकविणे आवश्यक आहे. मनोधैर्य टिकविण्यासाठी शिक्षकांच्या मागण्यांसंदर्भात ग्रामविकासमंत्री आणि शिक्षणमंत्री यांच्यासमवेत राज्य शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घडविण्यासाठी पुढाकार घेऊ, असे आश्वासन राज्य आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी यावेळी  शिक्षकांना दिले. 

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची महामंडळ सभा अहिल्यानगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी (ता.पारनेर) येथे आयोजित करण्यात आली होती. या सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात, राज्य अध्यक्ष बाळासाहेब मारणे, उपनेते रावसाहेब रोहकले, समन्वय समितीचे अध्यक्ष मधुकर काटोळे, राष्ट्रीय शिक्षक महासंघाचे नेते बाळासाहेब झावरे, राष्ट्रीय अध्यक्ष आबासाहेब जगताप, उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, महासचिव मच्छिंद्रनाथ मोरे, कार्यकारी अध्यक्ष बलवंत पाटील, सरचिटणीस किशन इदगे, कार्यकारी अध्यक्ष विलास चौगुले, कार्याध्यक्ष संतोष कदम, कोषाध्यक्ष अनिरुद्ध पवार, नगरपालिका शिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष सचिन डिंबळे, केंद्रप्रमुख संघटनेचे राज्य अध्यक्ष राजेंद्र जगताप, महिला आघाडीच्या राज्य अध्यक्षा स्वाती शिंदे, अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे, जेष्ठ साहित्यिक संजय कळमकर तसेच राष्ट्रीय,राज्य संघाचे सर्व पदाधिकारी, विविध जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.

पद्मश्री पोपटराव पवार पुढे म्हणाले, " जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडल्या तर,  गोरगरिबांची मुले शिकणार कुठे? हा प्रश्न आहे. शिक्षण हे उद्याचे राष्ट्राचे भवितव्य आहे. त्यामुळे  सरकारच्या पातळीवरील शिक्षकांच्या न्याय मागण्यासाठी मी स्वतः पुढाकर घेऊन, या विषयावर सरकारशी चर्चा करेन. कारण जिल्हा परिषद शाळांमध्ये गरीब आणि सर्वसामान्य मुलांना शिक्षण मिळते. या शाळेतच मुलांना संस्कार मिळतात. त्यामुळे जिल्हा परिषद शाळा टिकल्या तरच गावाचे गावपण, संस्कार,संस्कृती टिकणार आहे." 

दरम्यान, या सभेत बोलताना राज्याचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी राज्य शिक्षक संघ हा शिक्षकांच्या प्रश्नासाठी शासन दरबारी करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. या महामंडळ सभेसाठी राष्ट्रीय, राज्य, जिल्हा, तालुका संघाचे पदाधिकारी व राज्यभरातून मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते. ही महामंडळ सभा ऐतिहासिक झाली. शिक्षकांच्या प्रश्नावर विचारमंथन होऊन पुढील दिशा ठरविण्यात आल्याची माहिती पुणे जिल्हा शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष दत्तात्रेय वाळुंज यांनी दिली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रविण ठुबे यांनी केले. मंगेश खिलारी यांनी आभार मानले. संजय शेळके, रावसाहेब सुंबे, राम निकम, राजकुमार साळवे, सुरेश निवडुंगे, रघुनाथ झावरे, सूर्यकांत काळे, सुनिल दुधाडे, युवराज हिलाळ, ज्ञानेश्वर इंगळे आदींनी या कार्यक्रमाची व्यवस्था पाहिली.

प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांसाठी पुढाकार घेऊ - पद्मश्री पोपटराव पवार 

राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सवांद साधण्यात येईल, असे आश्वासन पद्मश्री पोपटराव पवार यांनी यावेळी दिले. 

शिक्षकांची अशैक्षणिक कामे शासनाने बंद करावीत आणि शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन दरबारी शिक्षक संघ शर्थीचे प्रयत्न करत आहे, याला बळकटी देण्यासाठी अण्णा हजारे व पोपटराव पवार यांना सोबत घेऊन शासन दरबारी दाद मागण्यात येईल.

- संभाजीराव थोरात, 
नेते, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ. 

जुनी पेन्शन योजना, टीईटी, पदोन्नती आदी प्रश्न न्यायालयात असतील तर, भविष्य अंधकारमय आहे. शिक्षक दिनापर्यंत शिक्षकांचे प्रश्न सुटले नाहीत तर हा दिन आक्रोश दिन म्हणून साजरा करू. शिक्षकांना वर्गात अध्यापन करू द्यावे. अशैक्षणिक कामे बंद करावीत.

- बाळासाहेब मारणे
 राज्य अध्यक्ष, 
प्राथमिक शिक्षक संघ. 

मुख्यालयी सक्ती व टीईटी या  प्रश्नावर राज्यपातळीवर वेळप्रसंगी व्यापक आंदोलन व कायदेशीर लढाई या मार्गाने शिक्षकांना राज्य शिक्षक संघ न्याय देईल.

- राजेश हिवाळे,
जिल्हाध्यक्ष, संभाजीनगर.