Panchayat Samiti precident Association : पुणे जिल्हयात पहिल्यायांदाच पंचायत समिती सभापतींची असोसिएशन स्थापन!
महाराष्ट्रातील पहिला प्रयोग : अध्यक्षपदी आंबेगाव पंचायत समितीचे सभापती कैलास काळे तर, उपाध्यक्षपदी हवेलीचे युवराज काकडे यांची निवड
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ३० जून २०२६ :- आपल्या विविध मागण्या आणि हक्कांसाठी पुणे जिल्ह्यातील सर्वपक्षीय पंचायत समिती सभापती एकत्र आले आहेत. यासाठी या सर्व सभापतींनी मिळून पुणे जिल्हा पंचायत समिती सभापती असोसिएशनची स्थापना केली आहे. अशा पद्धतीचा हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग ठरला आहे.
महाराष्ट्रात पहिल्यांदाच स्थापन करण्यात आलेल्या पुणे जिल्हा पंचायत समिती सभापती असोसिएशनच्या जिल्हा अध्यक्षपदी आंबेगाव पंचायत समितीचे सभापती कैलास काळे, उपाध्यक्षपदी हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे यांची आणि सचिवपदी बारामती पंचायत समितीचे सभापती सभापती किरण तावरे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या सभापतींची एक बैठक नुकतीच पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात झाली. या बैठकीत सर्वानुमते ही असोसिएशन स्थापन करण्यात आली. स्थापनेनंतर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. या बैठकीमध्ये जिल्ह्यातील पंचायत समितींच्या विविध समस्या, अधिकार व विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या निवडीनंतर असोसिएशनच्यावतीने जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती सभापतींच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांना देण्यात आले.
यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष कैलासबुआ काळे, उपाध्यक्ष युवराज काकडे यांनी सर्व पंचायत समित्यांना’ भेडसावणाऱ्या विविध अडचणी, समस्या सांगितल्या. आपापल्या तालुक्यातील विकासकामांसाठी आवश्यक निधी, अधिकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून जिल्हा तसेच राज्य पातळीवर प्रभावीपणे पाठपुरावा करण्यात येणार आहे. यासाठी प्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यात येणार असल्याचे असोसिएशनच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या बैठकीस नवनिर्वाचित अध्यक्ष कैलास काळे, उपाध्यक्ष युवराज काकडे, शिरूरच्या सभापती स्वाती घावटे, मावळच्या सभापती सुनीता येवले, भोरच्या सभापती मनीषा कंक, मुळशीच्या सभापती मंदा शेळके, राजगडच्या (वेल्हे) सभापती सुवर्णा राऊत, खेडच्या सभापती विद्या मोहिते, इंदापूरचे सभापती हर्षवर्धन लोंढे, पुरंदरचे सभापती अमित झेंडे आदी उपस्थित होते. बारामतीचे सभापती किरण तावरे हे दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
