Pdcc bank crop Loan waiver : पुणे जिल्ह्यातील ८३ हजार ३७६ शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पूर्ण पीक कर्ज माफ होणार ; अन्य २१ हजार २९९ शेतकऱ्यांची अंशतः कर्जमाफी!

संपूर्ण कर्ज माफीत ७४९ कोटी रुपयांचे तर, अंशतः कर्जमाफीत ७५१ कोटी रुपयांचे कर्ज माफ होणार : अन्य २ लाख १० हजार ८९४ शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळणार

Pdcc bank crop Loan waiver : पुणे जिल्ह्यातील ८३ हजार ३७६ शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पूर्ण पीक कर्ज माफ होणार ; अन्य २१ हजार २९९ शेतकऱ्यांची अंशतः कर्जमाफी!

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १३ जून २०२६ :- राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील ८३ हजार ३७६ शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे संपूर्ण पीक कर्ज माफ होणार आहे. यानुसार सर्व शेतकऱ्यांचे एकूण ७४९ कोटी १४ लाख रुपये माफ होणार आहेत. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या २ लाख १० हजार ८९४ शेतकऱ्यांना ९२७ कोटी ७९ लाख रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ मिळणार आहे. याशिवाय दोन लाखांहून अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे फिरणारी (शिल्लक) रक्कम भरणा केल्यास, अशा एकूण २१ हजार २९९ शेतकऱ्यांचे ७५१ कोटी २ लाख रुपयांचे पीक कर्ज माफ होणार आहे. 

संपूर्ण कर्जमाफी, अंशतः कर्जमाफी आणि कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या मिळून पुणे जिल्ह्यातील एकूण ३ लाख १५ हजार ५६९ शेतकऱ्यांचे मिळून एकूण २ हजार १०२ कोटी ९० लाख रुपयांचे कर्ज माफ होणार असल्याचे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.यावेळी जिल्हा बँकेचे संचालक व राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, संचालक संभाजी होळकर आणि प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शितोळे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र सरकारने नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. या कर्जमाफी योजनेनुसार दि.१ एप्रिल २०१९ ते दि. ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीककर्ज किंवा पुनर्गठित मध्यम मुदतीच्या  कर्जांपैकी दि. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत  थकीत असलेल्या आणि दि. ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न केलेल्या कर्जांना या माफीचा लाभ मिळणार असल्याचे प्रा.डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी यावेळी स्पष्ट केले. 

प्रोत्सानपर अनुदान कोणाला मिळणार? 

दरम्यान, सन २०२२-२३, सन २०२३-२४ आणि सन २०२४-२५ या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षांत पीक कर्ज घेतलेले असल्यास आणि या कर्जाची विहित मुदतीत परतफेड केली असल्यासच प्रती शेतकरी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. या शेतकऱ्यांनी सन २०२५-२६ आणि सन २०२६-२७ या आर्थिक दोन्ही आर्थिक वर्षात पीककर्ज घेतले असल्यास, या पीककर्जाची विहित मुदतीत परतफेड केलेली असणे अनिवार्य असल्याचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांनी यावेळी स्पष्ट केले. 

कर्जमाफीचा लाभ मिळणारे गटनिहाय  शेतकरी व रक्कम 

- दोन लाख रुपयांपर्यंतचे संपूर्ण पीक कर्ज माफ --- ८३ हजार ३७६ शेतकरी --- ७४९ कोटी १४ लाख रुपये. 

- अंशतः कर्जमाफीचा लाभ  --- २१ हजार २९९ शेतकरी --- ४२५ कोटी ९८ लाख रुपये. 

- प्रोत्साहनपर अनुदान लाभ --- २ लाख १० हजार ८९४ शेतकरी --- ९२७ कोटी ७९ लाख रुपये. 

- तीन गट मिळून एकूण --- ३ लाख १५ हजार ५६९ शेतकरी --- २ हजार १०२ कोटी ९० लाख रुपये. 

कर्जमाफी तालुकानिहाय पात्र शेतकरी व कर्जमाफी रक्कम 

(टीप :- अनुक्रमांक, तालुक्याचे नाव, शेतकरी संख्या आणि रक्कम या क्रमाने) 

१) आंबेगाव --- २३ हजार ७५३ --- ११० कोटी ८८ लाख रुपये. 

२) बारामती --- ३३ हजार १७५ --- २४२ कोटी ७१ लाख रुपये. 

३) भोर --- १७ हजार १७३ --- १०० कोटी ७५ लाख रुपये. 

४) दौंड --- ३८ हजार ४९५ --- ३४४ कोटी ६२ लाख रुपये. 

५) हवेली --- १० हजार ६०१ --- ७७ कोटी ६८ लाख रुपये. 

६) इंदापूर --- ३६ हजार ४९५ --- ३६५ कोटी ५ लाख रुपये. 

७) जुन्नर --- ३७ हजार ५७८ --- १९२ कोटी ४६ लाख रुपये.

८) खेड (राजगुरुनगर) --- ३७ हजार १८० --- १७२ कोटी २५ लाख रुपये. 

९) मावळ --- ९ हजार ५९० --- ५६ कोटी २० लाख रुपये. 

१०) मुळशी --- ५ हजार ७२२ --- २७ कोटी ९५ लाख रुपये. 

११) पुरंदर --- २५ हजार ३४ --- १४७ कोटी ३६ लाख रुपये. 

१२) शिरूर --- ३७ हजार ५३० --- २४८ कोटी ७७ लाख रुपये. 

१३) वेल्हे --- ३ हजार २४३ --- १६ कोटी २ लाख रुपये. 

१४)  एकूण --- ३ लाख १५ हजार ५६९ --- २ हजार १०२ कोटी ९० लाख रुपये. 

कर्जमाफीचा इंदापूर तालुक्याला सर्वाधिक फायदा 

दरम्यान, या कर्जमाफीचा पुणे जिल्हा सर्वाधिक फायदा हा राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या इंदापूर तालुक्याला होणार आहे. इंदापूर तालुक्यातील एकूण ३६ हजार ४९५ शेतकऱ्यांचे तब्बल ३६५ कोटी ५ लाख रुपयांचे कर्ज माफ होणार आहे. या तालुक्यातील पात्र ठरलेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी १३ हजार ९१८ शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे संपूर्ण कर्ज माफ होणार आहे. तसेच १५ हजार ६९८ शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. 

या कर्जमाफी योजनेत केवळ २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. अंशतः कर्ज माफीचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी दोन लाख रूपयांहून अधिक असलेली व नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनी ५० हजार रुपयांहून अधिक असलेली रक्कम आधी भरणा करणे आवश्यक आहे. तरंच या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे. 

- प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, 
अध्यक्ष, जिल्हा बँक, 
पुणे.