Pune zp political situation:  पुणे जिल्हा परिषदेत महायुती विरुद्ध महायुती+ महाविकास आघाडी! 

झेडपीच्या विषय समिती सदस्य निवडीच्या सभेतील चित्र : भिन्न-विभिन्न युतीने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसची चार तास कोंडी

Pune zp political situation:  पुणे जिल्हा परिषदेत महायुती विरुद्ध महायुती+ महाविकास आघाडी! 

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १७ एप्रिल २०२६ :-देशात आणि राज्यात सध्या महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असे राजकीय समीकरण आहे. मात्र याला पुणे जिल्हा परिषद अपवाद ठरली आहे. पुणे जिल्हा परिषदेत महायुती विरुद्ध महायुती+ महाविकास आघाडी असे भिन्न-विभिन्न चित्र पहावयास मिळाले. यासाठी निमित्त ठरले ते जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सदस्य निवडीचे. त्यामुळे यासाठी गुरुवारी (दि.१६ एप्रिल) आयोजित करण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत हे नवे  राजकीय समिकरण दिसून आले. या भिन्न-विभिन्न राजकीय समिकरणामुळे पुणे जिल्हा परिषदेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसची तब्बल चार तास मोठी कोंडी झाली. 

पुणे जिल्हा परिषदेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष केंद्र आणि राज्यात महायुतीचा एक घटक पक्ष आहे‌. महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच भारतीय जनता पक्ष(भाजप )आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) हे तीन पक्ष आहेत. याऊलट महाविकास आघाडीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या तीन पक्षांचा समावेश आहे. महाविकास आघाडीत असलेल्या तीन घटक पक्षांपैकी पुणे जिल्हा परिषदेत कॉंग्रेसचा एकही जिल्हा परिषद सदस्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा केवळ एक सदस्य असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा सदस्य आहेत. 

दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेच्या गुरुवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत महायुतीतील एक घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीतीलच भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी शह देण्याचा जोरदार प्रयत्न केला. विशेष म्हणजे यासाठी महायुतीतील भाजप व शिवसेना या घटक पक्षांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मदत घेतली. यामुळे पुणे जिल्हा परिषदेत महायुती विरुद्धमहायुती+महाविकास आघाडी असे चित्र पहावयास मिळाले.