विधानसभेच्या निवडणूक निरीक्षकांनी घेतला जिल्ह्यातील पेड न्यूजचा आढावा
जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम कक्षाची निवडणूक निरीक्षकांकडून पाहणी ग्रामराज्य वृत्तसेवा
Madyam kakahachi pahni kartana sarva nivdnuk nirikshak
ग्रामराज्य न्यूज नेटवर्क
पुणे, दि.१ नोव्हेंबर २०२४ :- भारत निवडणूक आयोगाने पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त केलेल्या सर्व निवडणूक निरीक्षकांनी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील प्रसिद्ध झालेल्या पेड न्यूजचा आढावा घेतला. यावेळी या निवडणूक निरीक्षकांनी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या माध्यम कक्षाची पाहणीही केली.
निवडणूक आयोगाने पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांसाठी अनुक्रमे मानवेश सिंह सिद्धू, ललित कुमार, भीम सिंह, पीगे लिगू, अरुंधती सरकार, नाझीम झई खान, गार्गी जैन, एम. गौतमी, संजीव कुमार, के हिमावती, ए वेंकादेश बाबू, उमेश कुमार, प्रेम प्रकाश मीना, सुमीत कुमार आणि अमीत कुमार आदींची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. या सर्व निरीक्षकांनी माध्यम कक्षाला भेट देऊन या कक्षाची पाहणी केली.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, निवडणूक शाखेच्या उपजिल्हाधिकारी मिनल कळसकर, जिल्हा माहिती अधिकारी तथा माध्यम कक्षाचे समन्वयक डॉ.रविंद्र ठाकूर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागातील सहायक प्राध्यापक योगेश बोराटे,सहायक संचालक जयंत कर्पे आदी उपस्थित होते.
यावेळी या निवडणूक निरीक्षकांनी मुद्रित (प्रिंट), इलेक्ट्रॉनिक आणि समाज माध्यमांवरील बातम्या, जाहिराती आणि पेड न्यूजबाबत कक्षातर्फे करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची माहिती घेतली. जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी माध्यम कक्षाच्या कामकाजाविषयी माहिती दिली. समन्वयक डॉ. रवींद्र ठाकूर, सहायक संचालक जयंत कर्पे यांनी माध्यम कक्षातर्फे तयार करण्यात येणाऱ्या विविध अहवालांची माहिती दिली. प्रा.बोराटे यांनी समाज माध्यमावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिराती, पेड न्यूज व त्यावर केलेली कार्यवाही याबद्दल माहिती दिली.
या माध्यम कक्षात सुमारे १० दूरचित्रवाणी संचांच्या माध्यमातून वृत्तवाहिन्यांतील निवडणूक प्रचार, जाहिरात, पेड न्यूज आदींच्या अनुषंगाने संनियंत्रण केले जात आहे. तसेच सामाजिक माध्यमांवरील पोस्टबाबतही बारकाईने संनियंत्रण केले जात आहे. वृत्तपत्रातील जाहिराती आणि पेड न्यूजबाबतही दररोजच्या वृत्तपत्रांचे अवलोकन केले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.