वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात बसपाचे तगडे आव्हान! बहुजन नेते हुलगेश चलवादी निवडणूक रिंगणात
सार्थक बडे
Umedwari aara dakhal kartana hulgesh chalwadi
पुणे, २९ ऑक्टोबर २०२४ :- विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात बहुजन समाज पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत असल्याने पुन्हा एकदा प्रस्थापित राजकीय पक्षांचे धाबे दणाणले आहे. पुण्यातील वडगाव शेरी मतदार संघात बसपाने प्रदेश महासचिव,पश्चिम महाराष्ट्राचे मुख्य प्रभारी, पुण्याचे माजी नगरसेवक मा.हुलगेश चलवादी यांना निवडणूक रिंगणात उतरवल्याने तिहेरी लढत रंगणार आहे. नामांकन अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मा.चलवादी यांनी बसपा समर्थक आणि पदाधिकार्यांच्या उपस्थित येरवडा येथील प्रादेशिक कार्यालयात त्यांचा अर्ज भरला.
सत्ताधारी आणि विरोधकांचे प्रस्थापित पक्ष आतापर्यंत कष्टकरी,अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीयांसोबतच पीडित, शोषित आणि उपेक्षितांची दिशाभूल करीत त्यांची थट्टा करीत आला आहे. सर्वसामान्यान मतदारांचा केवळ मतदानापुरता वापर करीत निवडून आल्यानंतर त्यांच्या मुळ प्रश्नांना बगल देण्याची स्पर्धाच प्रस्थापित पक्षांमध्ये बघायला मिळते. सर्वसामान्यांच्या जखमांवर फुंकर घालण्यासाठी त्यांचे हक्काचे प्रतिनिधित्व कायदेमंडळात जाणे आवश्यक असल्याने निवडणूक रिंगणात उतरलो आहे, अशी भावना यावेळी मा.चलवादी यांनी व्यक्त केली. एक सर्वसामान्यांचा प्रतिनिधी म्हणून निवडणूक लढवत असल्याने सर्वच नागरिक जाती-धर्माच्या पलिकडे जावून पाठीशी उभे राहतील,असा विश्वास यानिमित्ताने चलवादी यांनी व्यक्त केला.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पुणे स्थानकावरील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करीत अभिवादन करण्यात आले.नामांकन अर्ज दाखल करतांना मा.चलवादी यांच्यासोबत बसपचे प्रदेश सदस्य सुदीप गायकवाड, पुणे जिल्हाध्यक्ष दिलीत कुसाळे, पुणे जिल्हा प्रभारी महंमद शफी, शीतल गायकवाड यांच्यासह सर्व धर्माचे धर्मगुरू, सर्व समाज बांधव पक्षाचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.