Panchayat samiti precident election : पुणे जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांवर 'महिलाराज'!

सर्वाधिक १० पंचायत समित्यांवर 'राष्ट्रवादी'चा झेंडा : भोरमध्ये चिठ्ठीने दिली राष्ट्रवादी काँग्रेसला साथ

Panchayat samiti precident election : पुणे जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांवर 'महिलाराज'!

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ९ मार्च २०२६ :- पुणे जिल्ह्यातील तेरापैकी सात पंचायत समित्यांवर 'महिलाराज' आले आहे. त्यामुळे या सात पंचायत समित्यांचा कारभार आता महिला हाकणार आहेत. या महिलांना जागतिक महिला दिनाच्या दुसऱ्याच दिवशी आपापल्या तालुक्याच्या पंचायत समितीच्या सभापतीपदाची भेट मिळाली आहे.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील तेरापैकी सर्वाधिक १० पंचायत समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. भोर पंचायत समिती सभापती व उपसभापती या दोन्ही पदांच्या निवडीत चिठ्ठीनेही राष्ट्रवादी काँग्रेसला साथ दिली आहे. यामुळे अनपेक्षितपणे ही पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली आहे. मात्र भाजप नेते आणि माजी आमदार संग्राम थोपटे यांचे भोर पंचायत समितीवर भाजपची सत्ता आणण्याचे स्वप्न हे चिठ्ठीमुळे पूर्ण होऊ शकले नाही. 

उर्वरित तीनपैकी प्रत्येकी एक पंचायत समिती याप्रमाणे अनुक्रमे भाजप, शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मिळाली आहे. यानुसार दौंड पंचायत समितीवर भाजप, जुन्नर पंचायत समितीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि खेड पंचायत समितीवर शिवसेनेची सत्ता स्थापन झाली आहे. महिलाराज आलेल्या पंचायत समित्यांमध्ये जुन्नर, शिरूर, खेड,मावळ,भोर, मुळशी आणि वेल्हे आदींचा समावेश आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता ही मावळ, बारामती, पुरंदर, आंबेगाव, वेल्हे, मुळशी, शिरुर, हवेली, इंदापूर आणि भोर या दहा पंचायत समित्यांमध्ये आली आहे. 

पुणे जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांच्या मिळून एकूण १४६ जागा आहेत. यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे तब्बल ९३ सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठोपाठ भाजपचे २९, शिवसेनेचे १०,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ९ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ५ सदस्य आहेत.

पंचायत समित्यांचे नवे सभापती व उपसभापती 

- तालुका --- सभापती --- उपसभापती 

- जुन्नर --- कमल शेळकंदे --- अमित ढोले 

- आंबेगाव --- कैलासबुवा काळे --- ज्योती पारधी

- शिरूर --- स्वाती घावटे --- रामराव सासवडे 

- खेड --- विद्या मोहिते --- मंगेश सावंत 

- मावळ --- सुनिता येवले --- साहेबराव कार्टे

- दौंड --- सुखदेव चोरमले ---अमृता गिरमकर 

- बारामती --- किरण तावरे --- शुभांगी आगवणे 

- पुरंदर --- अमित झेंडे --- प्रविण जगताप 

- इंदापूर --- हर्षवर्धन लोंढे --- जयकुमार कारंडे 

- भोर --- मनिषा कंक --- विशाल कोंडे 

- मुळशी --- मंदा शेळके --- दगडू करंजावणे

- वेल्हे (राजगड) --- सुवर्णा राऊत --- संदीप खुटवड 

- हवेली --- युवराज काकडे --- विद्या गायकवाड