Zp committee Precident election : पुणे झेडपीच्या महिला व बालकल्याण सभापतीपदी इंदापूर तालुक्यातील अंकिता पाटील-ठाकरे तर, समाजकल्याण सभापतीपदी हवेली तालुक्यातील जितेंद्र बढेकर! 

उर्वरित दोन सभापतीपदी अमोल नलावडे व दीपाली हुलावळे बिनविरोध : वेल्हे तालुक्याला तब्बल २१ वर्षाच्या खंडानंतर सभापती पदाची संधी 

Zp committee Precident election : पुणे झेडपीच्या महिला व बालकल्याण सभापतीपदी इंदापूर तालुक्यातील अंकिता पाटील-ठाकरे तर, समाजकल्याण सभापतीपदी हवेली तालुक्यातील जितेंद्र बढेकर! 

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २  एप्रिल २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापतीपदी इंदापूर तालुक्यातील बावडा जिल्हा परिषद गटातून निवडून आलेल्या अंकिता पाटील-ठाकरे यांची तर, समाजकल्याण समितीच्या सभापतीपदी हवेली तालुक्यातील ऊरळीकांचन जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले जितेंद्र बढेकर यांची गुरुवारी (दि. २ एप्रिल) बिनविरोध निवड झाली. 

दरम्यान, उर्वरित दोन विषय समितीच्या सभापतीपदी मावळ तालुक्यातील खडकाळे जिल्हा परिषद गटातून निवडून आलेल्या दीपाली हुलावळे आणि वेल्हे तालुक्यातील विंझर जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले अमोल नलावडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. नलावडे यांच्या निवडीमुळे वेल्हे तालुक्याला तब्बल २१ वर्षाच्या खंडानंतर यंदा पहिल्यांदाच सभापती पदाची संधी मिळाली आहे. याआधी वेल्हे तालुक्यातील दिनकर धरपाळे यांनी ऑगस्ट २००४ ते फेब्रुवारी २००५ या कालावधीत बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती म्हणून काम पाहिलेले आहे. 

दरम्यान, दीपाली हुलावळे आणि अमोल नलावडे या दोन सभापतींना विषय समित्यांचे वाटप करण्याचे अधिकार जिल्हा परिषद अध्यक्षांना आहेत. यानुसार या दोन्ही सभापतींना येत्या १६ एप्रिलला विषय समित्यांचे वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी यावेळी केली.

जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या नवनिर्वाचित  सभापतीपैकी अनुक्रमे अमोल नलावडे व अंकिता पाटील-ठाकरे हे दोन सभापती दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेवर निवडून आलेले आहेत. दीपाली हुलावळे आणि जितेंद्र बढेकर हे पहिल्यांदाच पुणे जिल्हा परिषदेवर निवडून आलेले आहेत. 

हवेलीचे प्रांताधिकारी यशवंत माने यांनी या निवडणुकीसाठी पीठासन अधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे आदी उपस्थित होते.

येत्या १६ एप्रिलला झेडपीची सर्वसाधारण सभा 

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या उर्वरित दोन विषय समित्यांच्या सभापती पदांचे वाटप करण्यासाठी जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. याशिवाय या सभेतच विषय समित्यांच्या नवीन सदस्यांची निवड केली जाणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी यावेळी सांगितले.