Zp committee Precident election : पुणे झेडपीच्या विषय समित्यांच्या नवीन सभापतींची नावे निश्चितीसाठी येत्या बुधवारी मुंबईत बैठक!

अंतिम केलेली नावे बंद पाकिटातून येणार : येत्या गुरुवारी सकाळी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर बंद पाकिट फोडणार

Zp committee Precident election : पुणे झेडपीच्या विषय समित्यांच्या नवीन सभापतींची नावे निश्चितीसाठी येत्या बुधवारी मुंबईत बैठक!

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ३१ मार्च २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेच्या विविध चार विषय समित्यांच्या नवीन सभापतींची नावे निश्चित करण्यासाठी येत्या बुधवारी (दि.१ एप्रिल) मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सूनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या या बैठकीला जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी मंत्री व आमदारांना निमंत्रित करण्यात आले आहे.

ही बैठक देवगिरी बंगल्यावर होणार आहे. या बैठकीतच पुणे जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या चार नवीन सभापतींची नावे निश्चित केली जाणार असल्याचे विश्वनिय सूत्रांकडून मंगळवारी (दि.३१ मार्च) 'ग्रामराज्य'ला सांगण्यात आले. 

दरम्यान, पक्षाच्या वतीने विविध सभापती पदांसाठी निश्चित करण्यात आलेली नावे जाहीर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांची बैठक येत्या गुरुवारी (दि. २ एप्रिल) जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्या सरकारी बंगल्यावर आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक येत्या गुरुवारी सकाळी १० वाजता बोलाविण्यात आली आहे. या बैठकीतच विषय समित्यांच्या चार सभापतींची नावे जाहीर केली जाणार आहेत, असे जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते श्रीमंत ढोले यांनी सांगितले. 

पुणे जिल्हा परिषद विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवड करण्यासाठी येत्या गुरुवारी (दि.२ एप्रिल) दुपारी तीन वाजता जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेतच नवीन सभापतींची निवड केली जाणार आहे.  या निवडणुकीत हवेलीचे प्रांताधिकारी यशवंत माने हे पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहे‌त. 

झेडपी अध्यक्ष बंगल्यावरच उमेदवारी अर्ज भरणार 

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांचे उमेदवारी अर्ज जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावरच भरले जाणार आहेत. तेथे भरलेले हे उमेदवारी अर्ज जिल्हा परिषदेत येऊन पीठासन अधिकाऱ्यांकडे दाखल केले जाणार आहेत. 

कसे दाखल करावे लागणार उमेदवारी अर्ज 

जिल्हा परिषदेत विविध विषय समित्यांसाठी मिळून चार सभापती पदे आहेत. यामध्ये बांधकाम व आरोग्य, कृषी व पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण आणि समाजकल्याण या चार सभापती पदांचा समावेश आहे. यापैकी महिला व बालकल्याण आणि समाजकल्याण या दोन सभापती पदासाठी त्या त्या विषय समित्यांच्या नावाने उमेदवारी अर्ज दाखल करावा लागतो. उर्वरित दोन विषय समित्यांच्या पदासाठी फक्त सभापती पदासाठी अर्ज दाखल करावा लागतो. या दोन सभापतींची निवड जाहीर झाल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष हे दोनपैकी एका सभापतींकडे बांधकाम व आरोग्य आणि दुसऱ्या सभापतींकडे कृषी व पशुसंवर्धन विभागाची जबाबदारी सोपवत असतात. यानुसार याबाबतची घोषणा जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे हे या सर्वसाधारण सभेत करतील. 

विषय सभापती निवडणूक कार्यक्रम 

- निवडणूक --- दि. २ एप्रिल २०२६. 

- उमेदवारी अर्ज दाखल करणे --- निवडणुकीच्या दिवशी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत. 

- सभापती निवडीची सभा --- दि. २ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३ वाजता. 

- उमेदवारी अर्जांची छाननी --- सभा सुरू होताच सभेतच उमेदवारी अर्जांची छाननी करणार 

- उमेदवारी अर्ज माघारीसाठी मुदत --- उमेदवारी अर्ज छाननीनंतर १५ मिनिटे देणार.