Pune Zp committee Precident election : पुणे झेडपीच्या विषय समिती सभापती निवडीचे सूत्र ठरले!
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी आमदारांची मुंबईत बैठक संपन्न : विषय समिती सभापती निवडीत इंदापूर, बारामती व पुरंदर हे तीन तालुके वगळण्याची आमदारांची मागणी
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १ एप्रिल २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेच्या विविध चार विषय समित्यांच्या सभापती निवडीत मंत्र्यांचे तालुके असलेले बारामती व इंदापूर आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षांचा पुरंदर हे तीन तालुके वगळा, अशी मागणी पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी आमदारांनी बुधवारी (दि.१ एप्रिल) रात्री मुंबईत झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री व पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली.
मात्र सभापती निवडीचे अंतिम अधिकार सुनेत्रा पवार यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे पालकमंत्री सुनेत्रा पवार या मागणीची दखल घेऊन सभापती पदे निश्चित करतात की पक्षहिताच्यादृष्टीने उपयुक्त असलेल्या तालुक्यांना प्रतिनिधित्व याकडे संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. याशिवाय विषय समिती सभापती पदासाठी नाव अंतिम करताना तालुका हा निकष ग्राह्य न धरता विधानसभा मतदारसंघ हा निकष ग्राह्य धरण्याची मागणीही या बैठकीत करण्यात आली.
दरम्यान, याआधी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे दौंड आणि उपाध्यक्ष पद हे आंबेगाव विधानसभा मतदारसंघाला देण्यात आलेले आहे. त्यामुळे हे दोन्ही तालुकेही सभापती पदाच्या निवडीत वगळले जाणार आहेत. तसेच बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर हा विधानसभा मतदारसंघ भोर, वेल्हे आणि मुळशी या तीन तालुक्यांचा मिळून बनलेला आहे. त्यामुळे हा एकच मतदारसंघ ग्राह्य धरण्यात येणार आहे.
विषय समिती सभापती निवडीचे असे ठरले 'सूत्र'
- मावळ --- १ सभापती पद.
- खेड व जुन्नर --- या दोनपैकी कोणत्याही एका तालुक्याला १ पद.
- शिरूर व हवेली --- या दोनपैकी कोणत्याही एका तालुक्याला १ सभापतीपद.
- मुळशी, भोर व वेल्हे --- या तीनपैकी कोणत्याही एका तालुक्याला १ सभापतीपद.
ऐनवेळी बारामतीला १ पद गेल्यास?
जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीचे संभाव्य सूत्र वरीलप्रमाणे ठरले असले तरी, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याप्रमाणे बारामती विधानसभेत १ सभापतीपद ठेवण्याचा आग्रह बारामती विधानसभेतील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी धरला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवत १ सभापतीपद हे बारामती तालुक्याला दिल्यास, ऐनवेळी भोर विधानसभा मतदारसंघातील सभापती पदाचा पत्ता कट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र फक्त भोर विधानसभाच नव्हे तर मावळचा अपवाद वगळता अन्य कोणत्याही तालुक्यातील सभापती पदाचा पत्ता ऐनवेळी कट होऊ शकतो, असे या बैठकीला उपस्थित असलेल्या विश्वसनीय सूत्रांकडून ग्रामराज्य न्यूज पोर्टलला सांगण्यात आले.
सभापती पदासाठी सव्वा-सव्वा वर्षाचा कार्यकाळ?
दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी होण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ हा सव्वा-सव्वा वर्षाचा करावा, अशीही मागणी या बैठकीत करण्यात आली. यामुळे पाच वर्षांच्या कालावधीत एकूण २४ जिल्हा परिषद सदस्यांना पदाधिकारी होण्याची संधी मिळेल, असा यामागचा उद्देश असल्याचे उपस्थित आमदारांनी सुनेत्रा पवार यांना सांगितले.
