Zp committee Precident election : पुणे जिल्हा परिषदेच्या यंदाच्या पदाधिकारी निवडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी आमदारांचाच 'पगडा'!
राष्ट्रवादी काँग्रेसचे झेडपी सदस्य उरले फक्त नावापुरते : विषय समिती सभापती निवडीचे सूनेत्रा पवार यांना सर्वाधिकार प्रदान
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ३१ मार्च २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेच्या यंदाच्या पदाधिकारी निवडीमध्ये पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी आमदारांचीच मोठी चलती असल्याचे दिसून येत आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या यंदाच्या पदाधिकारी निवडीत ज्यांचा मोठा सिंहाचा वाटा असायला हवा, अशा जिल्हा परिषद सदस्यांनाच पदाधिकारी निवडीत चार हात दूर ठेवले जात आहे. यामुळे पदाधिकारी निवडीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी आमदारांचाच मोठा 'पगडा' असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित झेडपी सदस्य मात्र केवळ नावापुरतेच उरले असल्याचे चित्र पुणे जिल्हा परिषदेत पहावयास मिळत आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची नावे निश्चित करण्यात पक्षाचे आजी-माजी आमदारचं बाजी मारताना दिसत असून, याऊलट या प्रक्रियेत पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्यांनाच विचारातच घेतले जात नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यांमध्ये मोठा नाराजीचा सूर पहावयास मिळू लागला आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे नव्या पदाधिकाऱ्यांची नावे निश्चित करण्यासाठी पक्षाचे आजी-माजी आमदार हे जिल्हा परिषद सदस्यांना डावलून पुण्याऐवजी थेट मुंबईतच पक्षाच्या अध्यक्षा व राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन परस्पर चर्चा करत आहेत. या चर्चेत आपापल्या मर्जीतील जिल्हा परिषद सदस्यांची नावे पुढे करत आहेत आणि यासाठी पुन्हा पदाधिकारी निवडीचे सर्वाधिकार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना देण्यात आल्याची टिमकी वाजवत असल्याचे पक्षाच्या काही जिल्हा परिषद सदस्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर ग्रामराज्य न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले. शिवाय या सदस्यांनी याबाबत तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे नाव निश्चित करण्याचे सर्वाधिकार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना देण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी निश्चित केलेल्या या पदांसाठीच्या नावांपैकी एक नाव अचानकपणे आणि तेही ऐनवेळी बदलण्यात आले. हे नाव अचानकपणे बदलल्यामुळे सुद्धा पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
दरम्यान, येत्या दि. २ एप्रिलला जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या चार सभापतींची निवड केली जाणार आहे. याबाबतची नावे निश्चित करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी आमदारांनी विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुंबईतील देवगिरी बंगल्यावर पक्षाध्यक्षा सूनेत्रा पवार यांच्याबरोबर बैठक घेतली आणि विषय समिती सभापती पदासाठी आपापल्या मर्जीतील सदस्यांच्या नावाचा आग्रह धरला आणि आम्ही ही नावे सूचवत असलो तरी नाव निश्चितीचे सर्वाधिकार आम्ही तुम्हालाच (सूनेत्रा पवार) देत असल्याचे या आजी-माजी आमदारांनी सूनेत्रा पवार यांना सांगितले.
"मतदान झेडपी सदस्यांचे, मग सर्वाधिकार देणारे आजी-माजी आमदार कोण?"
जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी जिल्हा परिषद सदस्य मतदान करत असतात. त्यामुळे या पदांसाठी नावे निश्चित करताना, आधी पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्यांची मते विचारात घेणे आवश्यक आहे. शिवाय पक्षाध्यक्षांना सर्वाधिकार देण्याचा निर्णय सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी घेणे आवश्यक आहे. असे असताना पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्यांना डावलून सर्वाधिकार देणारे आजी-माजी आमदार कोण?, असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे.
