Pune zp standing committee members : पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीवर महिला व पुरूषांना समान संधी : भाजप व शिवसेनेचा प्रत्येकी एका सदस्याचा समावेश!

शांताराम इंगवले, गावडे, ढोले, जगताप,कोंडे, झेंडे, हरगुडे, बुट्टे पाटील यांची बिनविरोध निवड! 

Pune zp standing committee members : पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीवर महिला व पुरूषांना समान संधी : भाजप व शिवसेनेचा प्रत्येकी एका सदस्याचा समावेश!
पुणे :- पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे नवे सदस्य.

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १७ एप्रिल २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीवर (Standing committee) महिला आणि पुरुषांना समान संधी देण्यात आली आहे. यानुसार या समितीवरील एकूण आठ जागांपैकी महिला आणि पुरुषांना  प्रत्येकी चार जागा देण्यात आल्या आहेत. स्थायी ही जिल्हा परिषदेची दुसऱ्या क्रमांकाची आणि महत्वपूर्ण समिती मानली जाते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे या समितीचे अध्यक्ष असतात. दरम्यान, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने स्थायी समितीच्या आठपैकी दोन जागा विरोधी पक्षाच्या सदस्यांना दिल्या आहेत. यामध्ये भाजप व शिवसेनेच्या प्रत्येकी एका सदस्यांचा समावेश आहे. 

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीवर निवड झालेल्यांमध्ये मुळशी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य शांताराम इंगवले, शिरूर तालुक्यातील भाजपचे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गावडे, जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते श्रीमंत ढोले (इंदापूर), राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती तालुक्यातील सदस्य मंगेश जगताप, पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्या रुपाली झेंडे, हवेली तालुक्यातील शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) जिल्हा परिषद सदस्या रुपाली कोंडे आणि राजगुरूनगर (खेड) तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या सुनिता बुट्टे पाटील यांचा समावेश आहे. या सर्व सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. 

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत एकूण १३ सदस्य आहेत. यापैकी जिल्हा परिषद उपाध्यक्ष व विविध विषय समित्यांचे चार सभापती असे एकूण पाच सदस्य हे पदसिद्ध सदस्य असतात. उर्वरित आठ सदस्य हे जिल्हा परिषद सदस्यांमधून निवडले जातात. जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे या समितीचे सचिव असतात. 

पुणे जिल्हा परिषदेत एकूण विविध दहा विषय समित्या आहेत. यामध्ये स्थायी समिती, जलव्यवस्थापन व स्वच्छता, अर्थ, शिक्षण, बांधकाम, आरोग्य, कृषी, पशूसंवर्धन व दुग्धशाळा, समाजकल्याण आणि महिला व बालकल्याण आदी समित्यांचा समावेश आहे. या सर्व समित्यांमध्ये स्थायी समिती ही पहिल्या क्रमांकाची जिल्हा परिषदेत दुसऱ्या क्रमांकाची समिती मानली जाते.