Zp Social justice committee reservation : जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या सदस्यांच्या ४ जागा 'ओबीसीं'साठी तर, २ जागा महिलांसाठी राखीव!  

समाजकल्याण समिती सदस्यांच्या ११ पैकी ५ जागा अनुसूचित जाती आणि जमातीसाठी आरक्षित

Zp Social justice committee reservation : जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या सदस्यांच्या ४ जागा 'ओबीसीं'साठी तर, २ जागा महिलांसाठी राखीव!  

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा  

पुणे, दि.५ एप्रिल २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीच्या सदस्य पदाच्या एकूण ११ पैकी ०४ जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गातील (ओबीसी) जिल्हा परिषद सदस्यांसाठी तर, अन्य २ जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत. उर्वरित पाच जागा या अनुसूचित जाती (एस.सी.) आणि अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गातील झेडपी सदस्यांसाठी आरक्षित असतील. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या पाचपैकी किमान दोन जागा अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गातील जिल्हा परिषद सदस्यांना देणे बंधनकारक आहे.  

या कायदेशीर बंधनामुळे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीच्या एकूण सदस्यांपैकी सर्वाधिक ०४ जागा या नागरिकांच्या मागास प्रवर्गातून (ओबीसी), तीन जागा अनुसूचित जाती (एस.सी.) प्रवर्गातील सदस्यांसाठी आणि महिला व अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गातील प्रत्येकी दोन सदस्यांना समाजकल्याण समितीच्या सदस्यांपदी निवडून देणे जिल्हा परिषदेवर बंधनकारक राहणार आहे.  

महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम १९६१ मधील तरतुदीनुसार जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीची रचना निश्चित करण्यात आलेली आहे. यानुसार या समितीचे पूर्वी एकूण ९ सदस्य होते. समाजकल्याण समितीची रचना ही महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ च्या कलम ८० (ख) प्रमाणे आहे.

यानुसार पाच जागा अनुसूचित जातीच्या आणि अनुसूचित जमातीच्या सदस्यांसाठी राखीव आहेत. यापैकी किमान दोन जागा अनुसूचित जमातीसाठी आणि चार जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) राखीव आहेत. अशा प्रकारे कलम ८० (ख) (एक) नुसार समाजकल्याण समिती नऊ परिषद सदस्यांपासून बनलेली आहे. परंतू कलम ८० (ख) (दोन) नुसार समाजकल्याण समितीवर जिल्हा परिषदेने  महिला सदस्यांमधून निवडून दिलेल्या दोन महिलांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे या समितीच्या सदस्यांची एकूण संख्या आता ११ झालेली आहे.