Zp school Primary Teachers' Entertainment Cricket cup : झेडपी शाळांतील शिक्षकांनी लुटला क्रिकेट स्पर्धांचा आनंद! 

आंबेगाव तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी चषकाचे आयोजन : विविध बिटमधील शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग 

Zp school Primary Teachers' Entertainment Cricket cup : झेडपी शाळांतील शिक्षकांनी लुटला क्रिकेट स्पर्धांचा आनंद! 

ग्रामराज्य वृत्तसेवा 

आंबेगाव, दि. ९ एप्रिल २०२६ :- आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या 'प्राथमिक शिक्षक मनोरंजन चषक' क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांनी क्रिकेट स्पर्धेचा आनंद लुटला.

राजेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत तालुक्यातील विविध बिटमधील जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे माजी सदस्य आणि पुणे जिल्हा शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष दत्तात्रेय वाळुंज यांच्या हस्ते करण्यात आले. राजेवाडी येथील या क्रिकेट स्पर्धेत तालुक्यातील असाणे, तळेघर, शिनोली, घोडेगाव, साल, अमोंडी, मंचर आणि अवसरी या विविध बीटमधील शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडासा विरंगुळा मिळावा, मनाला आनंद मिळावा आणि शिक्षकांमधील एकोपा वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने या  बीटनिहाय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेस आंबेगाव पंचायत समितीच्या उपसभापती ज्योती पारधी आणि बिरसा ब्रिगेडचे माजी अध्यक्ष प्रविण पारधी यांनी या भेट देऊन शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आदिवासी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र लोहकरे, पुणे जिल्हा शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष संजय हुले उपस्थित होते. 

प्राथमिक शिक्षकांनी मानसिक ताण कमी करण्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी खेळाचे महत्त्व जपले पाहिजे, असे मत यावेळी बोलताना दत्तात्रेय वाळूंज यांनी व्यक्त केले. स्पर्धेचे यशस्वी आयोजन पोपट बेंढारी, संतोष गवारी, तानाजी सोनवणे,अरविंद मोढवे,अशोक कडाळे, संदीप डामसे, रामकिसन गवारी, मच्छिंद्र झांजरे,संतोष बांबळे, संतोष आचार्य, नितीन शिंदे, विजय घिसे, विलास भोर महेश शिंदे, सचिन लोहकरे, रामचंद्र सुपे, रोहिदास गवारी,संजय बुरुड, मनोजकुमार सरदार आदींनी  केले.

या स्पर्धेत विश्वास साबळे, विक्रांत साबळे व चिंतामण लांघी यांनी पंच म्हणून काम पाहिले. या स्पर्धेची ट्रॉफी व पारितोषिके वैशाली गाढवे,राजेंद्र शेळकंदे,मच्छिंद्र लोहकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. सर्व शिक्षकांनी एकत्र येत ही क्रिकेट स्पर्धा यशस्वी केली. क्रिकेट खेळण्याचा आणि एकत्र भोजनाचा आनंद सर्वांनी लुटला असून हा दिवस सर्वांसाठी अविस्मरणीय ठरल्याचे मत यावेळी शिक्षकांनी व्यक्त केले.