Sant Gadge Baba Sanitation Award : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात पुणे जिल्ह्यातील काळवाडी ग्रामपंचायत पुणे विभागात 'सर्वोत्कृष्ट'!
कोल्हापूर जिल्ह्यातील जांबरे व हिरलगे ग्रामपंचायतींना अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक : कडाचीवाडी ग्रामपंचायतीला पाणी व्यवस्थापनाचा ७५ हजार रुपयांचा विशेष पुरस्कार जाहीर
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि.२० जुलै २०२६ :- संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत सन २०२५-२६ या वर्षांच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत पुणे जिल्हा काळवाडी (ता. जुन्नर) ही ग्रामपंचायत पुणे विभागात 'सर्वोत्कृष्ट' ठरली आहे. या ग्रामपंचायतीने पुणे विभागातील प्रथम क्रमांक पटकावत १२ लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले आहे.
या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील जांबरे (ता. चंदगड) ग्रामपंचायतीने द्वितीय तर, याच जिल्ह्यातील हिरलगे (ता. गडहिंग्लज) या ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक पटकावला आहे. द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार ९ लाख रुपये तर, तृतीय क्रमांकाचा पुरस्कार ७ लाख रुपयांचा आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील कडाचीवाडी (ता. राजगुरुनगर) या ग्रामपंचायतीने उत्कृष्ट पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापनासाठी दिला जाणारा ७५ हजार रुपयांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचा सन २०२५-२६ या वर्षासाठीचा निकाल संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान विभागीय तपासणी समितीच्या सदस्य-सचिव तथा पुणे महसूल विभागाच्या अप्पर आयुक्त (विकास) प्रांजल शिंदे-चोभे यांनी मंगळवारी (दि.२० जुलै) जाहीर केला.
विभागीय स्पर्धेत काळवाडी ग्रामपंचायतीने ग्रामस्वच्छता, लोकसहभाग, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकास या सर्व निकषांवर उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांकाचा मान पटकावला. ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग व ग्रामपंचायतीच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे हे यश मिळाल्याचे काळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच तुषार शरद वामन यांनी सांगितले.
पुणे विभागातील प्रथम क्रमांक आणि उत्कृष्ट पाणी गुणवत्ता व व्यवस्थापनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष पुरस्कार, अशा दुहेरी यशामुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्वच्छता, जलसंवर्धन आणि लोकसहभागाच्या उपक्रमांना नवी ऊर्जा मिळाली असल्याचे जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूषण जोशी यांनी दिली.
काळवाडी ग्रामपंचायतीचा आतापर्यंत विविध २१ पुरस्कार
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील काळवाडी ग्रामपंचायतीला आतापर्यंत विविध २१ पुरस्कार मिळाले आहेत. यापैकी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गतचा हा प्रमुख पाचवा पुरस्कार आहे. याआधी याच ग्रामपंचायतीला पुणे विभागाचा दुसरा, पुणे जिल्ह्यातून एकदा पहिला, एकदा दुसरा आणि जुन्नर तालुक्यातून पहिला असे प्रमुख चार पुरस्कार मिळाले आहेत.
काळवाडी ग्रामपंचायत ही गेल्या १५ वर्षांपासून उत्कृष्ट काम करत आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचा राज्यात पहिला क्रमांक पटकावणे हे आमचे मुख्य ध्येय असून, त्यादृष्टीने आम्ही काम करत आहोत. आम्ही आमच्या गावात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून गावातील ग्रामस्थांना आर्थिक स्थैर्य उपलब्ध करून देत, त्यांचे जीवनमान उंचावण्यावर भर देत आहोत. दरवर्षी ग्रामपंचायत कराची (घरपट्टी, नळपट्टी) १०० टक्के वसुली होत आहे.
- तुषार शरद वामन,
सरपंच, काळवाडी, ता. जुन्नर.
या यशामुळे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील स्वच्छता, पाणी व्यवस्थापन आणि लोकसहभागाच्या उपक्रमांना नवी प्रेरणा मिळाली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संबंधित ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, ग्रामस्थ, स्वच्छता कर्मचारी तसेच या अभियानात योगदान देणाऱ्या सर्वांचे अभिनंदन.
- वीरधवल जगदाळे,
अध्यक्ष,जिल्हा परिषद पुणे.
