Pune Zp Online Complaint System : ... आता पुणे जिल्ह्यातील ग्रामस्थांना घरबसल्या करता येणार झेडपीकडे तक्रार, राज्यातील जिल्हा परिषदांमधील पहिला प्रयोग!
जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची माहिती : ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींसाठी नवीन ऑनलाइन तक्रार निवारण प्रणाली विकसित
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २१ एप्रिल २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील ग्रामस्थ आणि जिल्हा परिषद सदस्यांसाठी ऑनलाईन तक्रार करण्यासाठीची सोय उपलब्ध करून दिली आहे. यासाठी जिल्हा परिषदेने खास ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामस्थांना आणि जिल्हा परिषद सदस्यांना आता घरबसल्या एका क्लिकवर जिल्हा परिषदेकडे तक्रार नोंदविता येणार आहे. यामुळे ग्रामस्थांना त्यांची अडलेली कामे मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषदेचे उंबरठे झिजविण्याची गरज भासणार नाही. अशा पद्धतीचा हा राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील पहिलाच प्रयोग ठरणार असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विरुधवल जगदाळे यांनी दिली.
यासाठी जिल्हा परिषदेच्या पुर्वीच्या संकेतस्थळात (वेबसाईट) आमूलाग्र बदल केले आहेत. शिवाय हे संकेतस्थळावर आता पूर्णपणे जिल्हा परिषदेची मालकी प्रस्थापित करण्यात आली आहे. यानुसार आता राष्ट्रीय तंत्रज्ञान केंद्राच्या (NIC)मदतीने पुणे जिल्हा परिषदेने स्वतंत्र संकेतस्थळ विकसित केले आहे. पूर्वी हे काम एका खासगी संस्थेमार्फत केले जात होते. यामुळे जिल्हा परिषदेचा महत्वाचा डेटा चोरी होण्याची शक्यता होती. ही शक्यता आता नवीन संकेतस्थळामुळे मावळली आहे.
दरम्यान, ग्रामस्थांच्या तक्रारींचे ऑनलाइन निराकरण करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने पुर्वीच्या संकेतस्थळात सुधारणा करून त्यात आधुनिक ई-गव्हर्नन्स प्रणाली, जनता तक्रार निवारण प्रणाली, तातडीची मदत व हेल्पलाइन, वापरकर्तास्नेही सुविधा, प्रशासकीय कार्यक्षमता आणि ई-ऑफीस प्रणालीचा विस्तार केला आहे.
या सर्व नवीन प्रणालीमुळे जिल्हा परिषदेच्या विकासकामांचे नियोजन व देखरेख अधिक कार्यक्षमतेने पूर्ण करणे, ग्रामस्थांना योजनांची माहिती मिळणे, जिल्हा परिषद विविध विभागांची अद्ययावत माहिती मिळणे, जनतेच्या तक्रारीचे निवारण करणे आणि ऑनलाईन तक्रार नोंदवून घेणे आदी सुविधा उपलब्ध होणार आहेत.
झेडपी सदस्यांच्या पत्रांना ई- नंबर देणार
दरम्यान, जिल्हा परिषदेचे सदस्य विविध विकासकामांंबाबतची लेखी पत्रे ही जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या विविध विभागप्रमुखांना देत असतात. आतापर्यंत ही पत्रे संबंधित कार्यालयांकडून ऑफलाइन पद्धतीने स्वीकारली जात होती. मात्र आता हे पत्र ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहे. यामुळे प्राप्त पत्रांना ई- नंबर दिला जाणार आहे. ज्यामुळे जिल्हा परिषद सदस्यांनी दिलेली पत्रे आता गहाळ होण्याची शक्यता संपणार आहे.
लोकप्रतिनिधी आणि प्रशासन अशा दोन्ही स्तरांवर ई-ऑफिस संकल्पना राबविणारी पुणे ही राज्यातील एकमेव जिल्हा परिषद ठरली आहे. त्यामुळे पुणे ही राज्यातील पहिली स्मार्ट जिल्हा परिषद ठरण्याच्या मार्गावर आहे. चार महिन्यांपूर्वी प्रशासन स्तरावर ई-ऑफिस प्रणाली राबविण्यास सुरूवात झाल्यानंतर आता सर्व सदस्यांना यामध्ये सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही पारदर्शकतेच्या दिशेने मोठी झेप आहे.
- विरधवल जगदाळे,
अध्यक्ष, पुणे जिल्हा परिषद.
