Pune ZP School Modeled on 'Navodaya' 'नवोदय'च्या धर्तीवर खानवडीत पुणे झेडपीची शाळा : चार वर्षांनंतर यंदा पूर्ण झाले झेडपीचे स्वप्न!
खानवडी ठरणार 'सीबीएसई'ची देशातील पहिली झेडपी शाळा : जोतीराव फुले यांच्या जन्मदिनी होणार शाळेचे उद्घाटन
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ९ एप्रिल २०२६ :- नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर पुणे जिल्हा परिषदेचीही एक शाळा असावी, हे पुणे जिल्हा परिषदेने पाहिलेले स्वप्न सुमारे चार वर्षांच्या खंडानंतर यंदा पूर्ण झाले आहे. जिल्हा परिषदेच्या सन २०१७-२२ या कालावधीतील पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य व अधिकाऱ्यांनी सन २०२२ मध्ये पाहिलेले हे स्वप्न २०२६ मध्ये पूर्ण झाले आहे.
थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांच्या गावी म्हणजेच पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे ही भव्यदिव्य व सुसज्ज अशी शाळा साकारली आहे. या शाळेमुळे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर पूर्णपणे मोफत शिक्षण मिळणार आहे. ही शाळा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (सीबीएसई) आहे. त्यामुळे ही 'सीबीएसई' शिक्षण मंडळाची देशातील पहिली शाळा ठरली आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचे नियंत्रण असलेली ही शाळा असून या शाळेला थोर समाजसुधारक महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे संयुक्त असे ज्योती सावित्री जिल्हा शाळा असे नाव देण्यात आले आहे. या शाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत येत्या शनिवारी (दि. ११ एप्रिल) करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू-धोटे आदी उपस्थित होते.
महात्मा जोतीराव फुले यांचा दि. ११ एप्रिल हा जन्मदिन आहे. यावर्षी ११ एप्रिलपासून महात्मा फुले यांचे द्विशतताब्दी जयंतीवर्ष सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर ११ एप्रिलला या शाळेचे उद्घाटन करण्यात येत आहे. राज्य सरकारने या शाळेसाठी पुणे जिल्हा परिषदेला १२ एकर गायरान जमीन उपलब्ध करून दिली आहे. या जागेवरच ही ज्योती सावित्री निवासी व अनिवासी अशी दोन्ही प्रकारची आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा साकारली आहे. ही शाळा सुरू करण्यासाठीची ठराव जिल्हा परिषद तत्कालीन पदाधिकारी व सदस्यांनी सन २०२२ मध्ये मंजूर केला होता. हा ठराव मंजूर झाल्यानंतर दोन-तीन महिन्यात जिल्हा परिषदेवर प्रशासकराज आले. त्यामुळे या शाळेच्या इमारतीची व अद्ययावत सुविधांची संपूर्ण उभारणी ही प्रशासकराज कालावधीत पूर्ण झाली आहे. हे काम ऑक्टोबर २०२२ मध्ये सुरू करण्यात आले होते, असेही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी यावेळी सांगितले.
या शाळेच्या इमारतीसाठी फियाट इंडिया ऑटोमोबाइल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या (सीएसआर) माध्यमातून एकूण २१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. बेंगलोर येथील क्रिस्टल हाउस इंडिया या सामाजिक संस्थेमार्फत ही शाळा मोफत चालविण्यात येणार आहे. या शाळेसाठी जिल्हा परिषदेला एकही रुपयाचा खर्च येणार नसून खानवडी परिसरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांनाच प्रवेशासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. नवोदय विद्यालयाची परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेवर आधारीत ही प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल. ही शाळा खासगी संस्था चालविणार असली, तरी त्यावर जिल्हा परिषदेचेच नियंत्रण राहणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सांगितले.
...असाही एक योगायोग, 'सूचक'च होणार उद्घाटक
दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेने महात्मा जोतीराव फुले यांच्या गावी म्हणजेच खानवडी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची जिल्हा परिषद शाळा सुरू करण्याबाबतच ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मांडला होता. विशेष म्हणजे या ठरावाचे सूचक हे तत्कालीन सभागृहातील जेष्ठ सदस्य व जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष वीरधवल जगदाळे हे आहेत. त्यामुळे या शाळेच्या उभारणीसाठी सूचक असलेले वीरधवल जगदाळे हे आता अध्यक्ष या नात्याने या शाळेचे उद्घाटकही असणार आहेत. त्यामुळे सूचक हेच उद्घाटक होण्याचा दुर्मिळ योगायोगही निर्माण झाला आहे.
ज्योती सावित्री शाळेची वैशिष्ट्ये
- सीबीएसई बोर्डाची देशातील पहिली झेडपी शाळा.
- थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांच्या जन्मगावी खानवडी येथे शाळेची उभारणी
- इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत वर्ग.
- निवासी आणि अनिवासी अशी दोन्ही प्रकारची सोय.
- १२ एकर क्षेत्रावर शाळेची उभारणी.
- एकूण विद्यार्थी क्षमता --- २ हजार.
- पुढील शैक्षणिक वर्षापासून निवासी शाळा सुरू होणार.
- सुसज्ज व अत्याधुनिक तंत्रज्ञानासह २४ वर्गखोल्या.
- विज्ञान व संगणक प्रयोगशाळा.
- अनिवासी विद्यार्थ्यांना नाश्ता, दुपारचे जेवण व चहा मोफत.
- शाळेवर स्थानिक शिक्षकांची नियुक्ती.
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण उपलब्ध व्हावे, या उद्देशाने या शाळेची सुरुवात करण्यात येत आहे. या वर्षापासून बालवाडी ते दुसरीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले असून, यासाठी एकूण २६० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत. पुढील वर्षापासून सहावीपासून निवासी शाळा सुरू होणार आहे. सुरुवातीला ४० विद्यार्थ्यांना निवासी शाळेसाठी प्रवेश दिला जाणार आहे.
- वीरधवल जगदाळे,
अध्यक्ष, जिल्हा परिषद, पुणे.
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या निधीतून सीमाभिंत, अंतर्गत रस्ते,पादचारी मार्ग, सुशोभिकरण, निवासी वसतिगृह उभारण्यात आले असून वसतिगृहाचे काम अंतिम टप्यात आहे. या शाळांमध्ये अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा व वर्गखोल्या तयार केल्या आहेत.सीबीएसई बोर्डाची जिल्हा परिषद शाळा ही महाराष्ट्रातील आदर्श मॉडेल ठरेल.
- गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे.
