Pune Zp committee Distribution : पुणे झेडपीच्या विविध विषय समित्यांचे येत्या १६ एप्रिलला होणार वाटप!
समित्यांच्या सदस्यांची निवड करणार, विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन : नवे अध्यक्ष विरधवल जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली होणारी पहिली सभा
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १२ एप्रिल २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेच्या नवीन सभापतींना विषय समित्यांचे वाटप करण्यासाठी आणि विविध विषय समित्यांच्या सदस्य निवडीसाठी येत्या गुरुवारी (दि.१६ एप्रिल) जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत सध्या समितीविना असलेल्या तीन पदाधिकाऱ्यांना विषय समित्यांचे वाटप केले जाणार आहे. या तीन सभापतींकडे प्रत्येकी दोन समित्यांचा पदभार दिला जाणार आहे. यामध्ये अर्थ व शिक्षण, बांधकाम व आरोग्य आणि कृषी आणि पशुसंवर्धन या सहा समित्यांचा समावेश आहे.
दरम्यान, याच सर्वसाधारण सभेत विविध विषय समित्यांच्या समित्यांच्या मिळून एकूण ८३ सदस्यांची निवड केली जाणार आहे. नवे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार असून, जगदाळे यांच्या अध्यक्षतेखालील ही पहिली सभा असणार आहे. याआधीच्या दोन विशेष सर्वसाधारण सभा या अनुक्रमे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी आणि हवेलीचे प्रांताधिकारी यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली झाल्या होत्या.
पुणे जिल्हा परिषदेत एकूण विविध दहा विषय समित्या आहेत. यापैकी जिल्हा परिषद अध्यक्षांकडे दोन विषय समित्या असतात. उर्वरित आठपैकी उपाध्यक्ष आणि अन्य दोन सभापतींकडे प्रत्येकी दोन विषय समित्या असतात. महिला व बालकल्याण आणि समाजकल्याण या दोन समित्यांंसाठी प्रत्येकी एक असे दोन सभापती आहेत.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे स्थायी आणि जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीचे सभापती असतात. उपाध्यक्ष हे अर्थ आणि नियोजन आणि शिक्षण या दोन समित्यांचे सभापती असतात. बांधकाम समितीचे सभापती हे बांधकाम व आरोग्य, कृषी समितीचे सभापती हे कृषी व पशुसंवर्धन अशा प्रत्येकी दोन समित्यांचे सभापती असतात. समाजकल्याण आणि महिला व बालकल्याण समितीचे सभापती हे आपापल्या विषय समित्यांचे सभापती असतात.
समिती सदस्य निवडीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणे
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सदस्यपदी निवड होण्यासाठी इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. यानुसार इच्छुकांना दि. १६ एप्रिल रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत आपापले उमेदवारी अर्ज दाखल करावे लागणार आहेत. त्यानंतर दुपारी तीन वाजता विशेष सर्वसाधारण सभा सुरू होणार आहे.
झेडपीचा अर्थसंकल्प अवलोकनार्थ सभागृहासमोर ठेवणार
पुणे जिल्हा परिषदेचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प दि. १७ मार्च २०२६ रोजी तत्कालीन प्रशासक व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सादर केला आहे. त्यावेळी जिल्हा परिषदेचे नवे सभागृह अस्तित्वात आले नव्हते. त्यामुळे प्रशासक गजानन पाटील यांनी मंजूर केलेला हा अर्थसंकल्प दि. १६ एप्रिलच्या विशेष सर्वसाधारण सभेत अवलोकनार्थ मांडला जाणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष विरधवल जगदाळे यांनी सांगितले.
