Senior Congress leader Anantrao Thopte  passess away: कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा पुणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन! 

पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार चालू असताना गुरुवारी घेतला अखेरचा श्वास : सरकारी अधिकारी ते मंत्रीपदापर्यंत प्रवास करणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड 

Senior Congress leader Anantrao Thopte  passess away: कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा पुणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन! 
पुणे:- दिवंगत ज्येष्ठ कॉंग्रेस नेते अनंतराव थोपटे.

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा

पुणे, दि. ४ जून २०२६ :- कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात प्रदीर्घ काळ विविध खात्यांची जबाबदारी सांभाळलेले माजी मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अनंतराव नारायणराव थोपटे यांचे गुरुवारी (दि.४ जून) संध्याकाळी पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार चालू असताना निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. भाजपचे नेते व भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे हे त्यांचे पूत्र तर, पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या स्वरूपा थोपटे या त्यांच्या स्नुषा होत. ‌

सहकार खात्यातील अधिकारी, वेल्हे तालुक्याचे गट विकास अधिकारी ते कॅबिनेट मंत्री असा अनंतराव थोपटे यांचा राजकीय प्रवास झालेला आहे. त्यांच्या निधनामुळे पुणे जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली असून, काँग्रेस पक्षाने एक निष्ठावंत आणि मार्गदर्शक नेतृत्व गमावले आहे.

दिवंगत अनंतराव थोपटे यांनी पुणे जिल्ह्यातील भोर विधानसभा मतदारसंघाचे सुमारे ३० वर्षे यशस्वीपणे नेतृत्व केले होते. भोर आणि परिसराच्या विकासात त्यांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा होता. आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत त्यांनी सुमारे १४ वर्ष इतका प्रदीर्घ काळ राज्य मंत्रिमंडळात  कॅबिनेट मंत्री म्हणून विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली. पुण्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम केले होते.

पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्ष वाढविण्यात आणि कॉंग्रेस हा पक्ष तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यात थोपटे यांचे मोठे योगदान होते. विशेषतः शरद पवार यांनी काँग्रेसपासून वेगळे होत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतच्या कठीण काळात अनंतराव थोपटे यांनी काँग्रेसचे विधीमंडळातील गटनेते म्हणून पक्षाची धुरा सांभाळली आणि जिल्ह्यात काँग्रेसची पाळेमुळे घट्ट ठेवली. त्यांच्या निधनाबद्दल राजकीय आणि सामाजिक स्तरातून तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे.

वयाच्या पंचविसाव्या वर्षीच दिवंगत अनंतराव थोपटे यांचा सहकार क्षेत्राशी संबंध आला. सन १९५८ मध्ये ते सहायक तालुका सहकार अधिकारी या पदावर शासकीय सेवेत रुजू झाले होते. सन १९५८ ते १९७१ या कालखंडात त्यांनी शासकीय अधिकारी म्हणून सेवा बजावली. सहकार अधिकारी याबरोबरच विविध संस्थामध्ये प्रमुख पदावर काम केले. वेल्हे तालुक्याचे गटविकास अधिकारी म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला.

निवडणूक लढविण्याचा निर्धार 

दरम्यान, अनंतराव थोपटे यांचा मूळ पिंड कार्यकर्त्याचा असल्याने शासकीय सेवेत त्यांचे मन रमले नाही. त्यामुळे थोपटे यांनी सन १९७२ मध्ये  शासकीय सेवेचा राजीनामा दिला आणि अपक्ष उमेदवार म्हणून भोर विधानसभेची निवडणूक लढविली. या निवडणुकीत ते विजयी झाले.  ‌ त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांची सहकार,सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीस सुरुवात झाली.

उत्कृष्ट कुस्तीपटू, सहकारी अधिकारी ते कॅबिनेट मंत्री 

दिवंगत अनंतराव थोपटे हे उत्कृष्ट कुस्तीपटू होते. त्यांनी सन १९५२ ते १९५७ अखिल भारतीय विद्यापीठ चॅम्पियनशीप कुस्तीमध्ये सलग ५ वेळा सुवर्णपदक मिळवले. अनंतराव थोपटे यांनी तत्कालीन पुणे विद्यापीठातून (सध्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) जी.डी.सी आणि ए. ची पदवी घेतली. वयाच्या ३९ व्या वर्षी  म्हणजेच सन  १९७२ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले.

दरम्यान, सन १९८३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांनी त्यांना पहिल्यांदा राज्यमंत्रिपद दिले. आमदारकीच्या दुसऱ्याच टर्ममध्ये त्यांना मंत्रिपद मिळाले. दुग्धविकास, परिवहन, पशुसंवर्धन, उच्च व तंत्रशिक्षण, पुनर्वसन, रोजगार हमी योजना, मत्स्यव्यवसाय, फलोत्पादन, संसदीय कार्य, विधिमंडळ कामकाज अशा अनेक खात्यांचा कारभार त्यांनी सांभाळला. 

राजकीय कारकीर्द 

- सन १९८१-८२ मध्ये पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक. 

-  पुणे जिल्हा भूविकास बँकेचे संचालक.

- पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तब्बल १५ वर्षे संचालक. 

- सन १९८३ ते १९९५ या कालखंडात कॅबिनेट मंत्री .दुग्धविकास, पशुसंवर्धन, उच्च व तंत्रशिक्षण, परिवहन, पुनर्वसन, रोजगार हमी योजना, मत्स्यव्यवसाय, फलोत्पादन, विधिमंडळ कामकाज,संसदीय कार्य खात्यांचा कारभार सांभाळला. 

- सन १९९० ते १९९४ या  कालखंडात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री.

- सन  १९९९ ते २००० या कालावधीत महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष(मंत्री दर्जा).

- महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ(महानंदा डेरी) या संस्थेचे पहिले अध्यक्ष .