Dr. Sandeep sangle selection : सतराव्या शब्दगंध साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. संदीप सांगळे यांची निवड! 

शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे व संस्थापक सचिव सुनील गोसावी यांची घोषणा : येत्या मे महिन्यात संमेलन होणार 

Dr. Sandeep sangle selection : सतराव्या शब्दगंध साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. संदीप सांगळे यांची निवड! 

ग्रामराज्य वृत्तसेवा 

तळेगाव ढमढेरे (जि.पुणे), दि. १ एप्रिल २०२६ :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आणि   पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. संदीप सांगळे यांची १७ व्या शब्दगंध साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. याबाबतची घोषणा शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे आणि संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी केली आहे. 

शब्दगंध साहित्यिक परिषदेची बैठक नुकतीच अहिल्यानगर येथे झाली. या बैठकीत प्रा. डॉ. सांगळे यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने दरवर्षी या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते.

प्रा. डॉ.सांगळे हे तळेगाव ढमढेरे  येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून गेली २५ वर्षे कार्यरत आहेत. शिवाय सध्या ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आहेत.त्यांचे आत्तापर्यंत स्वतंत्र लेखन आणि संपादन मिळून एकूण १७ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. तसेच ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवीचे मार्गदर्शक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत ११ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. ही पदवी प्राप्त केली आहे. 

दरम्यान, १७ व्या शब्दगंध साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. संदीप सांगळे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, मानद सचिव अरविंद ढमढेरे, विद्या सहकारी बँक व शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान संचालक महेश ढमढेरे, महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूगोल अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा.अर्जुन मुसमाडे यांनी डॉ. संदीप सांगळे यांचे या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.