जागतिक महिला दिन विशेष : नांदेड जिल्ह्यातील किनवट या आदिवासी तालुक्याच्या विकासात योगदान देणाऱ्या 'रणरागिणी'!

केंद्र सरकारच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत उचलला सिंहाचा वाटा 

जागतिक महिला दिन विशेष : नांदेड जिल्ह्यातील किनवट या आदिवासी तालुक्याच्या विकासात योगदान देणाऱ्या 'रणरागिणी'!

ग्रामराज्य वृत्तसेवा 

किनवट (जि. नांदेड) :- मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात येत असणारा किनवट हा अतिदुर्गम व आदिवासी समाजाचे प्राबल्य असणारा तालुका आहे. मात्र भौगोलिक परिस्थिती आणि आर्थिक अडचणींवर मात करत नांदेड जिल्हा परिषदेच्या सेवेत असलेल्या आशा स्वयंसेविका,अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि ग्रामसखी आदी पदावर कार्यरत असलेल्या महिला या आकांक्षित तालुका कार्यक्रमात मोठ्या कष्टाने जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा आढावा घेतला आहे.

यामध्ये आरोग्य सेविका प्रभावती गवळे, अंगणवाडी सेविका शोभा जाधव, ग्रामसखी रंजना गवले, आशा स्वयंसेविका वंदना पेंदोर आणि अंगणवाडी मदतनीस नेहा सुरोशे यांचा समावेश आहे. भारत सरकारच्या नीती आयोगाचा ‘आकांक्षित तालुका कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम’ देशातील ५०० मागासलेल्या तालुक्यामध्ये राबविण्यात येत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील २७ तालुक्यांचा समावेश असून नांदेड जिल्ह्यातील किनवट हा एकमेव तालुका या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी निवडण्यात आला आहे. 

या उपक्रमांतर्गत आरोग्य, पोषण, शिक्षण, कृषी, मुलभूत विकास आणि पायाभूत सुविधा अशा ४० सुचकांच्या माध्यमातून तालुक्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या महत्वपूर्ण कार्यक्रमात राज्यातील २७ तालुके समाविष्ट असून नांदेड जिल्ह्यातील एकमेव किनवट तालुकाचा समावेश आहे. 

नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, प्रकल्प अधिकारी जेनितचंद्र दोन्तूला यांच्या मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली आकांक्षित तालुका कार्यक्रमाचे काम सुरु आहे. या महत्वाकांक्षी कार्यक्रमात ग्रामस्तरीय आशा स्वयंसेविका, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामसखी अशा महिलांच्या खांद्यावर प्रामुख्याने महत्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्या महिलाही अत्यंत कष्टाने ही जबाबदारी पेलत आहेत. 

या ग्रामस्तरीय महिलांनी केलेल्या कर्तृत्वान कार्यामुळेच  किनवट या आदिवासी तालुक्याने  संपूर्णता अभियानात राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. जागतिक महिला दिनानिमित्त अशा कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा घेतलेला हा मागोवा आहे.

१) प्रभावती जगन्नाथ गवळे, (आरोग्य सेविका) :- 

प्रभावती जगन्नाथ गवळे या आरोग्यसेविका म्हणून किनवट तालूक्यातील मोहपूर येथे कार्यरत आहेत. त्यांनी पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन कम्युनिटी हेल्थ केअर आणि जर्नालिजमची पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली आहे. उच्चशिक्षित असूनदेखील त्यांनी आदिवासी भागात आरोग्यसेवेचे व्रत हाती घेतले आहे. त्या मोहपूर येथील उपकेंद्रात निवासी राहून अहोरात्र आरोग्य सेवा देत आहेत. माता- बाल संगोपन, लसीकरण, स्वच्छता आणि संसर्गजन्य रोगांपासून बचावासाठी अधिक प्रभाविपणे जनजागृती करण्याचे काम करत आहेत. तसेच त्या गरोदर स्त्रियांची नोंदणी, तपासणी, प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर काळजी घेण्यासह आवश्यक त्या आरोग्यसेवा पुरविण्याचे उल्लेखनीय कार्य करत आहेत. यासाठी त्यांना तालुका व जिल्हा स्तरावरून अनेकवेळा सन्मानित करण्यात आले आहे. गावातील लोकांच्या आरोग्यासाठी थेट काम करणाऱ्या प्राथमिक ‘आरोग्यदूत’ म्हणून त्या परिचित आहेत.

२) शोभा देविदास जाधव ( अंगणवाडी सेविका) :- 

शोभा देविदास जाधव या किंवा तालुक्यातील दरसावंगी (सि ) येथील अंगणवाडी क्रमांक २ मध्ये अंगणवाडीसेविका म्हणून कार्यरत आहेत. त्या पदवीधर असून त्यांचे काम गावापुरते मर्यादित न राहता त्या त्यांच्या परीसरात एक आदर्श अंगणवाडी सेविका म्हणून नावारूपास आल्या आहेत. पोषण ट्रॅकरसंदर्भात त्या एक प्रशिक्षिका म्हणून कार्य करत आहेत यामुळे त्यांच्या या अनुभवाचा विभागातील इतरांना तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी फायदा होत आहे. शुन्य ते सहा वर्षे वयोगटातील मुलांचे पूर्व- प्राथमिक शिक्षण, आरोग्य तपासणी, लसीकरण, पोषण आहार, तसेच गरोदर महिला व स्तनदा मातांची काळजी यासोबतच त्यानी त्यांच्या कार्यक्षेत्रात बालविवाह प्रतिबंधक अधिनियमाची प्रभावीपणे जनजागृती केली आहे. यासाठी त्यांचा जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय विभागप्रमुखांनी अनेकवेळा त्यांचा गौरव केलेला आहे. 

३) रंजना परसराम गवले (ग्रामसखी) :- 

रंजना परसराम गवले या किनवट तालुक्यातील कनकवाडी  येथील रहिवाशी असून त्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोत्ती अभियानांतर्गत कनकवाडी गाव पातळीवर ग्रामसखी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी गावात 23 महिला समूह सहाय्यता संघ स्थापन केले आहेत. यापैकी १७ समूहांना त्यांनी खेळते भांडवल उपलब्ध करून दिले आहे. १४ समूहांना जवळपास ५३ लाख रुपयाचे कर्ज मिळवून दिले आहे. केंद्र सरकार- मार्फत उद्योगासाठी ५ लक्ष ४० हजार रुपयाचे समुदाय गुंतवणूक निधी मिळवून दिला. उज्वल महिला स्वयंसहायता समूह गटाच्या व ग्रामोन्नती महिला ग्रामसंघाच्या माध्यमातून बॅग मेकींग, पापड उद्योग, पिठाची गिरणी, रेडीमेट गारमेंट असे अनेक उद्योग गावातील महिला करत आहेत. त्यातून महिला सक्षम होत आहेत.उमेद अभियानांतर्गत गावातील स्वयंसहाय्यता समूहातील महिलांना आर्थिक, तांत्रिक आणि सामाजिक सेवा थेट त्यांच्या दारात पोहोचवणारी प्रशिक्षित महिला प्रतिनिधी म्हणून त्या नावारूपास आल्या आहेत. त्यांच्यामुळे गावातील महिला शेती, बँकिंग आणि महिला सक्षमीकरणाच्या कामात पुढे येत आहेत. यामुळे ग्रामीण भागात महिला नेतृत्व विकसित होण्यास मदत होत आहे.त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. 

४) वंदना रमेश पेंदोर ( आशा स्वयंसेविका) :- 

वंदना रमेश पेंदोर रा.कनकवाडी येथील आशा स्वयसेविका असून त्या कनकवाडी आरोग्य उपकेंद्रांतर्गत कार्यरत आहेत. त्या समुदायातील आरोग्य जागरूकता, माता व बाल आरोग्य, लसीकरण, प्रसूतीपूर्व तपासणी, प्रसूतीनंतरची काळजी आणि स्वच्छतेविषयी माहिती देऊन आरोग्य यंत्रणा व ग्रामस्थ यांच्यात दुवा म्हणून काम करत आहेत. त्या स्वतः घटस्फोटीत असून खचून न जाता स्वत: ठाम उभे राहून परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी अविरत काम करत आहेत. एक आदर्श आशा कार्यकर्ती म्हणून त्या भूमिका बजावत आहेत आणि इतरांना प्रेरणा देत आहेत.

५) नेहा नारायण सुरोशे ( अंगणवाडी मदतनीस) :- 

नेहा नारायण सुरोशे या किनवट तालुक्यातील झेंडीगुडा येथील रहिवाशी असून त्या लोणी येथील अंगणवाडी येथे मदतनीस म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे शिक्षण हे एम.ए डी.एड. इतके आहे.मुळातच बालसंगोपन आणि रंजन शिक्षणाबाबत त्यांना आवड असल्यामुळे पूर्व प्राथमिक शिक्षण प्रक्रियेत त्यांचे योगदान अधिक प्रकर्षाने दिसून येत आहे. त्या प्रामुख्याने अंगणवाडीची स्वच्छता, मुलांसाठी पोषक आहार, ६ वर्षांखालील मुलांना खायला देणे आणि मुलांना केंद्रापर्यंत आणणे अशी कामे त्या प्रभावीपणे करत आहेत. प्रामुख्याने त्या या गावातील बाल- आरोग्य आणि कुपोषण निर्मूलनाच्या प्रक्रियेत संबंधित अंगणवाडी सेविका समवेत महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. त्यामुळे गावातील कुपोषणाचे प्रमाण कमी झाले आहे.